Pimpri Chinchwad  Ncp
Pimpri Chinchwad Ncp Sarkarnama
पुणे

Pimpri Chinchwad : 'मुख्यमंत्र्यांचे भूखंडाचे श्रीखंड बाहेर काढल्याने जयंत पाटलांवर कारवाई!'

सरकारनामा ब्यूरो

Pimpri Chinchwad News : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याचा दावा करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अधिवेशन संपेपर्यंत काल (ता.२२) निलंबित करण्यात आले. यानंतरआक्रमक झालेल्या राष्ट्रवादीने आज (ता.२३) विधासभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकत विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केले. पाटलांवरील कारवाईचे पडसाद आज उद्योगनगरीतही पिंपरीतही उमटले.

आपल्या नेत्याच्या निलंबनाच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, पक्षाचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. यावेळी "भाजपचे मिंधे एकनाथ शिंदे","50 खोके माजलेत बोके","नही चलेगी नही चलेगी तानाशाही नही चलेगी" अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भूखंडाचे श्रीखंड विधानसभेत बाहेर आणल्यामुळे सुडबुद्धीने ही कारवाई करण्यात आल्याचे मेहबूब शेख यावेळी म्हणाले.अजितदादा पवार आणि जयंत पाटील ही जय-वीरूची जोडी अधिवेशनात "गब्बर सिंग" राज्य सरकारला हतबल करत असल्याने सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल होत आहे. पुढच्या सात दिवसात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे पाटीलसाहेब बाहेर आणतील या भीतीने त्यांच्यावर कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला.

कोराना काळात फेस मास्क वापरला नसेल, परंतु आपल्या नाकर्तेपणामुळे कोविड नसताना फेसशील्ड वापरण्याची नामुष्की त्यांच्यावर आली, या शब्दात त्यांनी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा समाचार घेतला. पाटील यांचे अकारण केलेले निलंबन हा लोकशाहीचा अपमान असल्याचे गव्हाणे म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा भूखंड घोटाळा उघडकीस येईल, तसेच भाजप नेत्यांची पार्लमेंट ते पालिका भ्रष्टाचाराची मालिका याची पोलखोल होईल या भीतीने ही कारवाई केल्याचा दावा त्यांनी केला.तर, पाटील यांचे निलंबन असंवैधानिक असून विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यावर ही सूडबुद्धीने केलेली कारवाई आहे,असे इम्रान शेख म्हणाले.

राज्य सरकार हिटलरशाहीच्या दिशेने वाटचाल करत असून बेरोजगारी,महागाईचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा दाबत असल्याचा आरोप त्यांनी केला.महिला अध्यक्ष कविता आल्हाट,पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे,माजी युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवती शहराध्यक्षा वर्षा जगताप तसेच माधव पाटील, मनिषा गटकळ आदी या आंदोलनात सहभागी झाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT