Pune News: पुढच्या विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपमधील विद्यमान आमदार आणि इच्छुकांनी पुण्यातील पक्षाच्या अधिवेशनात फिरवण्याची एकही संधी सोडली नाही. अधिवेशन भरलेल्या म्हाळुंगे-बालेवाडीला जोडलेल्या रस्तोरस्ती भाजपच्या नेतेमंडळींनी ‘बॅनरबाजी’ करीत राजकीय उरुसच भरवला असल्याचे दिसत आहे.
नेत्यांच्या या ‘बॅनरबाजी'त गमतीजमती आणि ‘सिरिअस’ राजकारणही घडल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यात, पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगतापांच्या (Shankar Jagtap) ‘इवल्याशा’ बॅनरवर मोठे मोठे राजकारण केले गेल्याचे दिसत आहेत. म्हणजे, आधी पिंपरी-चिंचवड शहराची सूत्रे हाती घेऊन चिंचवड विधानसभा मतदारसंघावर चाल करण्याची खेळी शंकरशेठ आता उघडपणे करीत आहेत.
थोडक्यात, पुढच्या निवडणुकीत वहिनी म्हणजे, अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) नाहीत; तर मीच (शंकर जगताप) कसा उजवा आहे, हे शंकरशेठ यांनी बॅनरची माळ लावून पक्ष नेतृत्वाला दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
थोडक्यात आणि स्पष्टच सांगायचे तर अधिवेशनानिमित्त शंकरशेठ आणि त्यांच्या उत्साही समर्थकांनी जागोजागी उभारलेल्या बॅनरमध्ये वहिनींचा अर्थात, अश्विनी जगतापांचा फोटो ‘इवलासा’च ठेवला आहे. तर याच बॅनर शंकरशेठचा फोटो नजरेतून भरले. तो कोणाच्या नजरेतून सुटणार नाही, याची नीट काळजी घेतलेली आहे. पण वहिनींचा फोटो ज्या साइजमध्ये घेतला आहे; तो पाहण्यासाठी भाजपमधील ज्येष्ठ नेत्यांना तर खरोखरीच भिंग लावावी लागेल.
हे फोटोचे राजकारण शंकरशेठ आणि त्यांच्या समर्थकांकडून नजर चुकीने झालेच नसणार. तसे झाले असते; तर ते एखाद-दुसऱ्या बॅनरवर घडले असते. पण इथे ५०-१०० बॅनरवर शंकरशेठ यांचा मोठा फोटो आणि आमदार वहिनींचा फोटो शोधावा लागणार,असे चित्र आहे. तशा काही बॅनरचे सगळे फोटो ‘सरकारनामा’कडे आहेत.
राजकारणात दिखाऊपणा नेहमीच अधिक तेजीत असतो आणि त्याला चांगला भावही मिळतो. हे राजकारण मंडळींना कळत नाही, असे नाही. ते त्यांना ठाऊक असते.अशा राजकारणात शंकरशेठ कधीकाळी मागे होते. पण, राजकीय ‘शहाणपण’ हे कोण्याही नेत्यांना स्पर्धेत ते पुढे ओढते. त्यातूनच भाजपचे पिंपरी-चिंचवड शहराचे नवे कारभारी शंकरशेठ वेगाने पुढे आले आणि आपला वेग वाढवून पुढे जाण्याच्या बेतात आहेत.
म्हणजे, शहराचे नेतृत्व करणाऱ्या शंकरशेठना चिंचवडमधून थेट विधानसभेच्या दिशेने जायचे आहे. त्यासाठी शंकरशेठ जोरात कामाला लागले आहेत. मात्र, मुंबई गाठणे तेही व्हाया चिंचवड हे शंकरशेठ यांना तसे सोपे नाही. तरीही, त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना काही नाही, असे वाटते. त्यासाठीच आता शंकरशेठ ‘राजकारण’ करीत आहेत.
आजवरही ते तेच करीत होते. पण, आता ते राजकीय खेळ्या करीत असावेत. अशा खेळ्यांमधूनच शंकरशेठ भाजपच्या अधिवेशनानिमित्त सख्या वहिनी आणि दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी आमदार अश्विनी जगतापांना आव्हान देण्यास सुरवात केली आहे.
लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत जगताप घराण्यातून कोण उमेदवार अशी चर्चा होती. तेव्हा मात्र वहिनींना संधी दिली. त्याच काळात शंकरशेठही इच्छुक असल्याचे बोलले गेले. मात्र, वहिनी लढल्या, त्या आमदार झाल्या.
आता विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. त्यासाठी काही दिवसांआधी शंकरशेठ यांनी लढण्याची इच्छा तीही मीडियापुढे मांडली. त्यावरून आमदार वहिनी आवाक झाल्या आणि मी आणि मीच चिंचवडमधून लढणार असल्याचे सांगून, दीर-शंकरशेठ यांना बजावले. त्यावर शंकरशेठ काही न बोलता ‘चूप’ राहिले.
राजकारणात काही न बोलता बरेच काही करता येते, हे शंकरशेठ माहीत आहेच. अशातूनच अधिवेशनातील शंकरशेठ आणि त्यांच्या समर्थकांनी ‘बॅनरबाजी’चे राजकारण घडवून आणले, असावे. याआधी म्हणजे, गेली दीड वर्षे तरी शंकरशेठ लावत असलेल्या बॅनरवर वहिनींचा फोटो मोठा तेही त्यांच्या शेजारी असायचा. पण आता म्हणजे, विधानसभेसाठी चढाओढीचे राजकारण रंगत असल्यापासून शंकरशेठ ‘राजकारण’ करीत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच त्यांच्यातील ‘बॅनर’च्या राजकारणाकडे फोकस ठेवला जात आहे.
शंकरशेठ उभारलेल्या बॅनरवरच्या तळात शंकरशेठ यांचा फोटो आहे. बॅनरवर प्रमुख नेत्यांनंतर स्थानिक आमदारांचे फोटो आहेत. त्यातच, आमदार वहिनींचा फोटो आहे. ‘साऱ्याच आमदारांचे फोटो एकाच रांगेत आणि सारख्याच आकारात असल्याचा दावा शंकरशेठ करतीत. मात्र, हा दावा सारवासरव असू शकतो.
Edited by: Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.