Assembly Election 2024 : भाजपात मोठे बदल, पुण्यात कोणाला मिळणार कमळ आणि कोणाच्या हाती ठेवणार नारळ?

Bjp Pune : लोकसभेसारखेच विधानसभा निवडणुकीतही ठाकरे, पवार आणि काँग्रेसच्या 'स्ट्रॅटर्जी'चे ‘चॅलेंज’ राहणार असल्याने भाजप पुण्यात काही विद्यमान आमदारांना नारळ देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
bhimrao tapkir | chandrakant patil | madhuri misal | siddharth shirole | sunil kambale.jpg
bhimrao tapkir | chandrakant patil | madhuri misal | siddharth shirole | sunil kambale.jpgsarkarnama
Published on
Updated on

Pune News : शिंदे, अजित पवार आणि त्यावरही राज ठाकरेंना साथीला घेऊन लोकसभा निवडणूक लढवलेल्या भाजपचा या निवडणुकीत ‘शक्तीपात’ झाला. या निकालाने राजकीय अवसान गळालेल्या भाजपने आता विधानसभा निवडणुका जिंकण्याच्या इराद्याने जोरबैठका सुरू केल्या असून, पुण्यात भलेमोठे अधिवेशन भरवून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हजेरीने प्रदेश भाजप विधानसभा निवडणुकीचा 'शंखनाद' फुंकणार आहे.

लोकसभेसारखेच विधानसभा निवडणुकीतही ठाकरे, पवार आणि काँग्रेसच्या ( Congress ) 'स्ट्रॅटर्जी'चे ‘चॅलेंज’ राहणार असल्याने भाजप पुण्यात काही विद्यमान आमदारांना नारळ देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पुणे शहरातील भाजपच्या 5 पैकी किमान 3 जणांचे तिकीट कापले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. विरोधकांचे डाव लक्षात घेऊन, शिवाजीनगरसह पुणे कॅन्टोंमेंट, खडवासल्यात भाजप नव्या दमाचे उमेदवार देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पर्वतीतही नव्या राजकारणाचा प्रयोग असू शकतो. त्यामुळे या 3-4 मतदारसंघांतील भाजपमधील राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.

bhimrao tapkir | chandrakant patil | madhuri misal | siddharth shirole | sunil kambale.jpg
Assembly Election 2024 : मोठी बातमी! भाजप 'एवढ्या' जागा लढण्याच्या तयारीत, शिंदे अन् अजितदादांचं काय?

विशेष म्हणजे, या मतदारसंघांतून भाजपच्या ( bjp ) काही इच्छुकांनीही ‘फिल्डिंग’ लावून तिकिटासाठी प्रयत्न चालविले आहेत. दुसरीकडे, कोथरुडमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटलांविरोधातही भाजपमधून नव्या कार्यकर्त्यांना तिकिटाच्या शर्यतीत उतरविले जात असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे विधानसभा कोथरुडमध्येही काही बदल होतो का, याकडे लक्ष राहणार आहे.

पुण्यातील 8 मतदारसंघांतही विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत भाजपने एकहाती वर्चस्व उभे केले आणि सारे आमदार निवडून आले. त्यानंतर मागील म्हणजे, विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत मात्र, भाजपला धक्का बसला हडपसरमध्ये योगेश टिळेकर, वडगावशेरीतून जगदीश मुळीक पराभूत झाले. या निवडणुकीत भाजपच्या आमदारांची संख्या 8 वरून 6 झाली. आजघडीला ती 5 इतकीच आहे. त्यात, कोथरुड, कसबा, पर्वती, शिवाजीनगर, कॅन्टोंमेंट आणि खडकवासला मतदारसंघ भाजपकडे राहिले.

पोटनिवडणुकीत कसबा मतदारसंघही काँग्रेसकडे आला. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भिमराव तापकीर हे फार कमी मतांनी म्हणजे, 2 हजार 595 मतांनी निवडून आले. राष्ट्रवादीच्या सचिन दोडकेंचा निसटता पराभव झाला. या निवडणुकीत तापकीर यांना 1 लाख 20 हजार 518 मते आणि दोडकेंना 1 लाख 17 हजार 923 मते होती. तर शिवाजीनगरमध्ये भाजपच्या सिध्दार्थ शिरोळेंची दमछाक झाली आणि या मतदासंघात काँग्रेसच्या दत्ता बहिरट चांगले झुंजले. या लढतीत शिरोळे हे 5 हजार 124 मतांनी पुढे राहिले आणि आमदार झाले. त्यानंतर पुणे कॅन्टोंमेंटमध्येही 'टफ फाइट' झाली. तिथे भाजपचे सुनील कांबळे जिंकले; मात्र, त्यांचे मतााधिक्य हेही कांबळेंना काँग्रेसच्या रमेश बागवेंपेक्षा 5 हजार 12 मते जादा मिळाली. ते आमदार झाले.

पर्वती मतदारसंघात भाजपच्या माधुरी मिसाळांनी तब्बल 36 हजार 767 मतांनी आपला विजय मिळवला. शहरातील सर्व मतदारसंघात किंबहुना कोथरुडपेक्षा पर्वतीत भाजपला मोठे मताधिक्य मिळाले. लोकसभा निवडणुकीतही मिसाळांची ताकद दिसून आली. परंतु, या मतदारसंघातील काही जणांनी विशेषत: महापालिकेतील भाजपचे माजी सभागृह नेते, श्रीनाथ भिमाले, राजेंद्र शिळीमकरांनी मोठी ताकद लावली आहे. ‘पर्वतीत भाजपचे फारशी ताकद नसतानाही मी पक्ष वाढविल्याचे' सांगून आमदार पुन्हा लढणार असल्याचे मिसाळांनी आताच जाहीर करून टाकले आहे.

कोथरुडमध्ये चंद्रकांतदादांना मनसेच्या किशोर शिंदेंनी जोरदार टक्कर दिली, खुद्द चंद्रकांतदादा असूनही कोथरुड भाजपच्या हातून जाण्याची भीती होती. मात्र, निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात चंद्रकांतदादा भारी ठरत गेले आणि निवडून गेले. परंतु, शिंदेंच्या आव्हानापुढे चंद्रकांतदादांना 25 हजार 495 मताधिक्य राहिले.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजपच्या 2 जागा कमी झाल्या. तर खडकवासल्याचा निकाल विचार करायला भाग पाडणार आहे. त्यानंतर शिवाजीनगर, पुणे कॅन्टोमेंटमध्ये भाजपला पुढे नक्की धक्का बसू शकतो, याचे संकेत मिळाले. लोकसभा निवडणुकीतही या मतदासंघात भाजपला अपेक्षित मते मिळाली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकांची तयारी करताना भाजप नेतृत्वानं खडकवासला, शिवाजीनगर, पुणे कॅन्टोमेंट मतदारसंघाचं काय करायचे? हे फार गांभीर्याने घेतल्याचे समजते.

bhimrao tapkir | chandrakant patil | madhuri misal | siddharth shirole | sunil kambale.jpg
BJP Core Committee Meeting : शिंदे अन् अजितदादांना सोबत घेऊन की स्वबळावर लढणार? भाजपच्या बैठकीत मोठा निर्णय

विधानसभा निवडणुकीत भाजप आता कसली कसर ठेवणार नाही. मुळात लोकसभा निवडणुकीत प्रचंड ताकद लावूनही मोठ्या पराभवाचे तोंड पाहावे लागल्याने भाजप विशेषत: फडणवीस आता ताकही फुंकूनही पिण्याची शक्यता आहेत. त्यातूनच फडणवीस हे पुण्यातील संभाव्य पडछड रोखण्यासाठी आता आणखीच कठोर होऊन पावले टाकणार असल्याचे दिसून येऊ शकते. तसे झाल्यास पुण्यात धोक्यात असलेल्या मतदारसंघांतील उमेदवार सहज बदलले जाणार,हे नक्की. त्याच वेळी विधानसभा निवडणूक जिंकायचीच आणि आपलाच मुख्यमंत्री करायचाच, अशा झपाटलेपणातून महाविकास आघाडी खुद्द पवारसाहेबच तयारीत आहेत. त्यामुळे कोथरुडच काय तर साऱ्याच मतदारसंघांत भाजपला सावध खेळ्या कराव्या लागणार आहेत.

चंद्रकांतदांना कोथरूड सोपे नाही...

विधानसभेच्या मागील निवडणुकीत चंद्रकांतदादांचा 25 हजार 494 मतांनी विजय झाला. मात्र, या निवडणुकीत चंद्रकांतदादा आणि संबंध भाजपला मनसेच्या किशोर शिंदेंना तोंड देताना नाकीनऊ आले होते. एकीकडे चंद्रकांत पाटील हे बाहेरचा उमेदवार तर दुसरीकडे किशोर शिंदे स्थानिक उमेदवार असल्यानं सहानुभूती होती. त्यामुळेच भाजपच्या बालेकिल्ल्यात 'सीट' धोक्यात असल्यानं शेवटच्या टप्प्यात चंद्रकांतदादांसह भाजपची भलीमोठी यंत्रणा कामाला लागली आणि दादा निवडून आले. मात्र, हे 'लीड' फारसे नसल्याचं आजही बोलले जाते. त्यामुळे चंद्रकांतदादांना विधानसभेची आगामी निवडणूक सोपी असू शकत नाही. त्यासाठी विरोधक आतापासून एका तगड्या उमेदवाराच्या शोधात आहेत. या मतदारसंघातील राजकीय स्थितीचा भाजप विचार करू शकते.

2019 च्या निवडणुकीतील चित्र

पुणे कॅन्टोंमेंट

सुनील कांबळे - 52 हजार 160

रमेश बागवे - 47 हजार 148

शिवाजीनगर

सिध्दार्थ शिरोळे - 58 हजार 727

दत्ता बहिरट - 52 हजार 603 मते

कोथरुड

चंद्रकांत पाटील - 1 लाख 5 हजार 246

किशोर शिंदे - 79 हजार 751

पर्वती

माधुरी मिसाळ - 97 हजार 12

अश्‍विनी कदम - 60 हजार 245

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com