पिंपरी : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले, असा अहवाल राज्य सरकार नियुक्त उच्चस्तरीय चौकशी समितीने दिला असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Valse Patil) यांनी सांगितले. यामुळे भाजपचा (BJP) खरा चेहरा उघड झाला आहे. पुण्याच्या तत्कालिन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर याप्रकरणी काल (ता. २६ फेब्रुवारी) पुण्यात गुन्हा दाखल झाला. पण, त्यामागील खऱ्या सूत्रधारांवर आता कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम (Dr. Kailas Kadam) यांनी आज (ता.२७ फेब्रुवारी) केली. त्यांचा रोख हा फडणवीसांच्या दिशेने आहे.
फडणवीस मुख्यमंत्री असताना शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅप केलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांत कॉंग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही समावेश आहे. त्यामुळे फडणवीस आणि शुक्ला यांच्यावर कॉंग्रेसने हल्लाबोल केला नसता तर नवलच. त्यामुळे शहर कॉंग्रेसने या प्रकरणी आऱोपी झालेल्या शुक्लांच्या जोडीने फडणवीस यांच्याविरुद्धही आघाडी उघडून त्यांनाही आऱोपीच्या पिंजऱ्यात खेचले आहे. त्यामुळे हे फोन टॅपिंग प्रकरण घडले, त्यावेळी गृहमंत्रीपद तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांकडेच होते. परिणामी त्यांचीही चौकशी याप्रकरणी झाली पाहिजे, अशी मागणी डॉ. कदम यांनी केली आहे.
शुक्ला यांनी कोणाच्या आदेशाने किंवा दबावाने हे फोन टॅप केले हे पुढे आले पाहिजे, असे म्हणत भाजपची कोंडी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शुक्ला यांनी हे फोन टॅपिंगचे रेकॉर्ड कोणाला दिले? त्याचा मुळ उद्देश काय होता? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे महाराष्ट्रातील जनतेला मिळाली पाहिजेत, असे ते म्हणाले. महाराष्ट्रातील फोन टॅपिंग हे भाजपचे गुजरात मॉडेल आहे. भाजपने गुजरातमध्ये विरोधकांचा आवाज दाबून वेळप्रसंगी ब्लॅकमेलिंग करून सत्ता काबिज केली आहे, असा आरोप डॉ. कदम यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.