पुणे : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख व आयपीएस (IPS) अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. त्यांच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेकायदा फोन टॅपिंगप्रकरणी भारतीय तार अधिनियम कायद्यातील कलम २६ प्रमाणे हा गुन्हा दाखल झाला आहे. शुक्ला या सध्या हैद्राबादमध्ये प्रतिनियुक्तीवर असून, त्यांच्यावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) अतिरीक्त पोलीस महासंचालकपदाची जबाबदारी आहे.
दरम्यान त्यांच्यानंतर आता तत्कालिन मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या चौकशीची मागणी केली आहे. ते म्हणाले, फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे अशी सुप्रीम कोर्टाची सूचना आहे. त्यामुळे आमचे फोन अवैधपणे टॅप केल्याप्रकरणात तत्कालीन गृहमंत्र्यांचाही हात होता. तत्कालीन गृहमंत्री या नात्याने फडणवीस यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबत त्यांनी एका नियमावलीचाही फोटो ट्विट केला आहे.
मागील वर्षी विधिमंडळाच्या अधिवेशनात २०१५ ते २०१९ या पाच वर्षाच्या कालावधीमधील फोन टॅपिंग प्रकरणी प्रश्न उपस्थित झाला होता. याची पडताळणी करण्यासाठी तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. संबंधित समितीने २०१५ ते २०१९ या कालावधीमधील फोन टॅपिंगची पडताळणी केली होती. या समितीने राज्य सरकारकडे अहवाल दिला होता. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी रश्मी शुक्ला असताना हे फोन टॅपिंग झाले होते. सरकारने या अहवालाच्या आधारे पुणे पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात बेकायदा पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचे या अहवालात म्हटले आहे.
याबाबत बोलताना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना रश्मी शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे फोन अनधिकृतपणे टॅप केले होते. त्याचा राजकीय कारणासाठी उपयोग झाल्यानंतर हे बाहेर आले होते. या प्रकरणी नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशीत फोन टॅपिंग केल्याचे समोर आले. राज्याचे पोलिस महासंचालकांना कारवाई करायच्या सूचना दिल्या होत्या. शुक्ला या दोषी आढळल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅप करायचे असेल तर कायद्यानुसार सार्वजनिक सुरक्षा, दहशतवादी कृती, संवेदनशील घटना, परराष्ट्र संबंध या कारणासाठी फोन टॅप करता येतात. शुक्ला यांनी परवानगी ज्यासाठी घेतली ते सोडून इतर फोन टॅप केले.
शुक्ला यांनी नाना पटोले, बच्चू कडू, आशिष देशमुख आणि संजय काकडे यांचे फोन टॅप केले होते. नाना पटोले यांच्या नावासमोर अमजद खान असे लिहून त्यांचे फोन टॅप केले होते. बच्चू कडू यांचे नाव निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांचे नाव अभिजित नायर तर आशिष देशमुख यांचे नाव महेश साळुंके असे दाखवले होते. शुक्ला यांनी कायद्याचा भंग केला आहे. यात शुक्ला यांच्यावर सूड भावनेतून कारवाई केलेली नाही. ही घटना काल घडलेली नाही. यावर विधानसभेत चर्चा होऊन चौकशी समिती नेमली होती. या समितीचा अहवाल आता सरकारने स्वीकारला आहे, असेही वळसे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.