Congress Vs Rane  Sarkarnama
पुणे

Congress Vs Rane : हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या राणेंना काँग्रेसचा वानप्रस्थाश्रमाचा सल्ला!

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri Chinchwad News : अयोध्येतील श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले नसल्याने, 22 जानेवारी रोजी आयोजित प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी न जाण्याची भूमिका घेणाऱ्या शंकराचार्यांनी घेतली आहे. तर यावरून केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांनी हिंदू धर्मासाठी काय योगदान दिलं? असा सवाल उपस्थित केला होता. यावरून हिंदू संघटनांनी नव्हे तर काँग्रसने नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे. एवढच नाहीतर नारायण राणेंना थेट वानप्रस्थाश्रमाचा रस्ता धरण्याचा सल्ला दिला आहे.

दरम्यान, शिवसेना, काँग्रेसनंतर भाजपवासी झालेले आक्रमक नेते नारायण राणे(Narayan Rane) व त्यांचे दोन्ही पूत्र (आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे) यांच्याकडून आता काँग्रेसच्या या टीकेला लवकरच प्रत्युत्तर मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यातून हा कलगीतुरा आणखी आठ दिवस रंगण्याची चिन्हे आहेत.

पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे अध्यक्ष डॉ कैलास कदम यांनी राणेंना वानप्रस्थ आश्रमात जाण्याचा सल्ला देत, त्यांच्या विधानावर टोला लगावला आहे. तसेच शंकराचार्यांचा अपमान करणाऱ्या राणेंवर भाजप काय कारवाई करणार? अशी विचारणाही त्यांनी केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

'मंदिराचे बांधकाम अर्धवट राहिलेले असताना प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे असल्याचे हिंदू धर्मातील सर्वोच्च शंकराचार्यांनी स्पष्ट करूनही उलट त्यांच्यावरच तोंडसुख घेत त्यांचे योगदान काय अशी विचारणा करणाऱ्या राणेंनी शंकराचार्य व हिंदू धर्माचा अपमान केला आहे. शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या राणेंचे तरी काय योगदान? असा प्रतिप्रश्न करत त्यांचे वय पाहता त्यांनी वानप्रस्थाश्रमाचा मार्ग आता धरावा. असा टोला कदम यांनी लगावला आहे.

राणे हे राजकीय स्वार्थासाठी शिवसेनेतून काँग्रेसमध्ये व काँग्रेसमधून भाजपात गेले. तेथे त्य़ांना आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती करण्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणूनच मोदींसाठी हिंदू धर्माच्या सर्वोच्च पदावरील शंकराचार्यांनाच तुमचे योगदान काय? असा सवाल केला. एवढच नाहीतर त्यांच्यासारखे लोक हिंदू धर्म भ्रष्ट करत असून ते हिंदू धर्माला कलंक आहेत. हिंदु धर्माच्या परंपरेनुसार वयाच्या 51 ते 75 वर्षांचा कालखंड हा वानप्रस्थाश्रमात घालवायचा असतो. राणे 71 वर्षांचे आहेत. म्हणून त्यांनी आता वानप्रस्थाश्रमाचा मार्ग धरावा असा खोचक सल्ला कदमांनी दिला.

अयोध्येत राम मंदिर व्हावे ही सर्वांची इच्छा आहे, त्याला कोणाचा विरोध नाही. धर्म हा राजकारणाचा नाही,तर आस्थेचा विषय आहे परंतू, भाजपने राजकारणात धर्म आणून राजकीय स्वार्थ साधण्यासाठी अर्धवट मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्याची घाई चालवली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ती करुन मतांचा जोगवा मागण्यासाठी हे सर्व चालले आहे.

मागील 10 वर्षातील कामांवर ते मतं मागू शकत नाहीत, कारण त्यांनी लोकांना सांगावे असे काहीच केलेले नाही त्यामुळे रामाच्या नावावर मतं मागण्याचा हा खटाटोप आहे. राम मंदिरासाठी स्वतंत्र्य न्यास आहे. परंतू,भाजप व आरएसएसने (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ)या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा इव्हेंट केला आहे, अशी बोचरी टीकाही कदमांनी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT