PCMC Police Commissioner Krishnaprakash
PCMC Police Commissioner Krishnaprakash Sarkarnama
पुणे

कृष्णप्रकाश यांच्याकडे महिलेने पाच वर्षापूर्वीच्या फसवणुकीची केली तक्रार अन् आरोपीला झाली अटक

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : सध्या फसवणुकीच्या गुन्ह्यांत पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांतील या फसवणुकींची आता दाद लागत असल्याने हे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही वर्षे जु्न्या घटनांप्रकरणी आता गुन्हे दाखल होऊन त्यात अटकेची कारवाई होत आहे. नुकतीच एका भाजपच्या (BJP) नगरसेवकाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Ncp) कार्यकर्त्यालाही पोलिसांनी (Pimpri-Police) जुन्या घटनांतील दाखल गुन्ह्यात अटक केली आहे. त्यावरून मोठे वादळही उठले असून ते अद्याप शमलेले नाही.

अशाच एका फसवणुकीच्या गुन्ह्यात मुंबईतील एका महिलेच्या मुलीला सातारा येथील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसला (M.B.B.S) प्रवेश देतो असे सांगून तब्बल ४५ लाख रुपयांना पाच वर्षापूर्वी गंडा घालण्यात आला होता. आता त्याबाबत गुन्हा दाखल होऊन पिंपरीतील एकाला अटक झाली. तर साताऱ्यातील आय.एस.एन.आर.या मेडिकल कॉलेजचे प्रमुख देशमुखही या गुन्ह्यात आरोपी आहेत. मात्र, अद्याप त्यांना अटक झालेली नाही.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने ही कामगिरी केली आहे. त्यात किरण सुवर्णा (वय ४६, रा. संत तुकारामनगर,पिंपरी) याला पोलिसांनी मंगळवारी (ता.८ फेब्रुवारी) अटक केली. त्याला १२ तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे. याबाबत ग्यानदेवी अनिलकुमार ओझा (वय ४२, रा.चांदीवली, मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनीच ७ ऑगस्ट २०१६ ते २५ नोव्हेंबर २०२१ दरम्यान, झालेल्या आपल्या फसवणुकीबाबत पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय जोगदंड यांना चौकशीचा आदेश आयुक्तांनी दिला. त्यात तथ्य आढळले. म्हणून पिंपरी पोलिस ठाण्यात संगनमताने ही फसवणूक करणारे सुवर्णा व देशमुख यांच्याविरुद्ध सोमवारी (ता.७ फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला.तर, आज लगेचच त्यात सुवर्णाची गठडी वळण्यात आली.

आता देशमुख यांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. त्यासाठी एक पथक साताऱ्याला रवाना झाल्याचे समजते. दरम्यान, या जोडगोळीने अशाप्रकारे आणखी काहीजणांना गंडा घातल्याचा पोलिसांचा संशय आहे. जोगदंड व पिंपरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या पथकाने केलेल्या या कारवाईतील गुन्ह्याचा पुढील तपास पिंपरीचे पीएसआय नंदकुमार पतंगे करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT