Krishna prakash

 

Sarkarnama

पुणे

IPS कृष्णप्रकाश यांना गंडा घालायला गेला अन् भामटा असा अडकला सापळ्यात

गेले सहा वर्षे पोलिस अधिकाऱ्यांनाच टोप्या घालणारा हा भामटा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हाती लागला.

सरकारनामा ब्युरो

पिंपरीः अहमदाबादचा पोलिस आयुक्त विजयसिंह बोलतोय, असे सांगून महाराष्ट्रातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांना हजारो रुपयांना गंडा घालणाऱ्या तोतयाच्या पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) पोलिसांनी बुधवारी (ता. २९) मुसक्या आवळल्या. त्याने पिंपरीचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishna Prakash) यांचा खबरी (गुप्त बातमीदार) असल्याचे सांगत गुन्हे शाखेच्या पोलिसांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, या शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पोलिस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्यामुळे त्याचा हा डाव उधळला.

परिणामी गेले सहा वर्षे पोलिस (Police) अधिकाऱ्यांनाच टोप्या घालणारा हा भामटा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हाती लागला. बेकायदेशीर हत्यार विक्री करणाऱी टोळी पकडून देतो, अशी बतावणी करून तो पोलिस अधिकाऱ्यांकडून दहा ते पंधरा हजार रुपये उकळत होता. खलिउल्लाह अयानुल्ला खान (वय ४२, रा. जोगेश्वरी पश्चिम, मुंबई) असे या तोतया पोलिस कमिशनरचे नाव आहे. मुंबईत (Mumbai) जाऊन पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. तत्पूर्वी, त्याचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याच्या मागणीनुसार त्याला २४ हजार रुपये गूगल पे व पेटीएमव्दारे पिंपरी पोलिसांनी दिले होते.

पैसे उकळण्यासाठी त्याने पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांना २५ वेळा फोन केला होता. त्यांनी तो न उचलल्याने गुन्हे शाखेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, पोलिस निरीक्षक तथा पीआय अशा अनेक अधिकाऱ्यांना फोन करून त्याने पंधरा दिवस भंडावून सोडले होते. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पीआय देवेंद्र चव्हाण यांना या तोतयाचा संशय आला अन तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

पिंपरी-चिंचवड आय़ुक्तालयाच्या हद्दीत बेकायदेशीर पिस्तूल विक्रीसाठी काहीजण येणार आहेत, अशा गुप्त माहितीची थाप ठोकून त्याने त्यांचे फोटो, त्यांच्या मोटारीचा नंबर तसेच पिस्तूलाचे फोटोही पिंपरी पोलिसांना व्हाटसअपवर दिले होते. तत्पूर्वी त्याने पिंपरी चिंचवड पोलिसांच्या नियंत्रण कक्षातून आयुक्तांसह इतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे मोबाईल फोन नंबर अहमदाबादचा पोलिस आयुक्त असल्याची बतावणी करून घेतले होते.

आयुक्तांनी फोन न घेतल्याने त्याने त्यांच्या रिडरलाही फोन केला होता. नंतर सामाजिक सुरक्षा शाखेत अनेक फोन केले. त्यांना मात्र त्याने मी तुमच्या आयुक्तांचा खबरी बोलतोय, असे सांगितले. त्यांना बेकायदेशीर हत्यार विक्रीची माहिती देऊन त्याबदल्यात १५ हजार रुपये आपल्या बॅंक खात्यात जमा करण्यास सांगितले होते. त्यामुळे संशय येऊन पीआय चव्हाण यांनी मोबाईलवरून त्याचे लोकेशन तपासले असता ते मुंबई दिसले. त्यांचा संशय अधिक बळावला.

त्यानंतर चव्हाण व टीमने थेट मुंबई गाठली. गोरेगाव येथे सापळा रचून त्याला पकडले. अशाप्रकारे मुंबईत फसवणूक केल्याबद्दल त्याच्याविरुद्ध मालाड, गोरेगाव आणि ओशिवरा पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. तर, आता चिंचवडमध्ये पीआय चव्हाण यांच्या फिर्यादीवरून बुधवारी (ता.२९) आणखी एक तसाच गुन्हा दाखल झाला. प्राथमिक चौकशीत २०१५ पासून तो अशी भामटेगिरी करीत असल्याचे समजले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT