Ankush Shinde
Ankush Shinde sarkarnama
पुणे

गाजावाजा न करता नव्या सीपींची धडाकेबाज सुरुवात; तक्रारींसाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबर केला जाहीर

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : गेल्या महिन्यात वीस तारखेला बदली झालेले पिंपरी-चिंचवडचे (Pimpri-Chinchwad) पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश (Krishnaprakash) यांनी आपला वैयक्तिक मोबाईल नंबर शहरवासियांसाठी जाहीर केला होता. त्यावर येणाऱ्या तक्रारींवर ते कार्यवाही करीत होते. तर मिळणाऱ्या माहितीवरून कारवाई करण्यात येत होती. हा पायंडा नवे सीपी अंकुश शिंदे (Ankush Shinde) यांनी आपल्या पद्धतीने कसलाही गाजावाजा न करता पुढे चालू ठेवला आहे. मोबाईल नंबर जाहीर करणे काहीसे अडचणीचे ठरणार असल्याने त्यांनी त्याऐवजी खास व्हॉट्सअ‍ॅप नंबर जाहीर केला आहे. (Pimpri-Chinchwad Latest News)

पोलिस ठाण्यात, जर सर्वसामान्यांची तक्रार नोंदवून घेण्यात आली नाही, तर त्यांनी ९३०७९४५१८२ या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन नव्या पोलिस आयुक्तांनी केले आहे. त्यामुळे शहरवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे. तर, काम वाढेल म्हणून गुन्हेच दाखल न करून घेणाऱ्या पोलिस अंमलदार आणि अधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा शिंदे यांनी दिला आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या दर्शनी भागावर हा खास व्हॉट्सअ‍ॅप नंबर लावण्यात आला आहे. त्यावरील तक्रारींची स्वत सीपी पाहणी करून त्यावर कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

वीस एप्रिलला बदलीचा आदेश येताच शिंदे यांनी लगेच दुसऱ्या दिवशी पिंपरी-चिंचवडच्या पोलिस आयुक्तपदाचा पदभार हाती घेतला. पहिल्याच दिवशी त्यांनी वादग्रस्त ठरलेले गुन्हे शाखेचे सामाजिक सुरक्षा हे खास पथक बरखास्त केले. त्यानंतर शहरातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी पोलिस ठाण्यांना भेटी देण्यास सुरवात केली. त्यादरम्यान, त्यांनी लाच घेताना पोलिस ठाण्यावरील कोणी पकडला गेला, तर सबंधित पोलिस ठाण्याच्या प्रमुखालाच (वरिष्ठ पोलिस निरीक्षक तथा सिनिअर पीआय) जबाबदार धरले जाईल, अशी तंबी दिली.

त्यानंतर आता पोलिस ठाण्यात तक्रार दाखल घेतली नाही, तर त्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप नंबरच तक्रारदारांसाठी जाहीर केल्याने शहर पोलिसांनी आपल्या नव्या बॉसची काहीशी धास्तीच घेतली आहे. कुठलाच गाजावाजा न करता लो प्रोफाईल राहत नव्या सीपींनी धडाकेबाज कामास सुरवात केल्याने तीन आठवड्यांतच त्यांच्या कामाची चर्चा सुरु झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT