Pimpri Chinchwad News : शहरात ‘शत-प्रतिशत’चा नारा देणारे भाजपचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे आणि शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत लढणारे विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभाग क्रमांक 28 मधून मात्र सोयीस्कररित्या समोरासमोर न लढता वेगवेगळे लढत आहेत. त्यामुळे या दोन काटेंमध्ये ‘काटें की टक्कर’ न होता केवळ ‘नुरा कुस्ती’च होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) स्थानिक नेते नाना काटे यांचा पिंपळे सौदागर हा प्रभाग आहे. 2007 ची निवडणूक वगळता, हे दोन्ही स्थानिक नेते एकमेकांसमोर लढले नाहीत. 2007 च्या निवडणुकीत नाना काटे विजयी झाले होते; तर पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे दुसऱ्या क्रमांकावर होते. त्यावेळी शत्रुघ्न काटे तिसऱ्या क्रमांकावर गेले होते. त्यानंतर 2012 व 2017 मध्ये हे दोन्ही काटे सोयीस्कररित्या एकमेकांसमोर आले नाहीत.
विशेष म्हणजे 2017 च्या निवडणुकीत तत्कालीन दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शत्रुघ्न काटे यांना नाना काटे यांच्यासमोर लढण्याचा आग्रह धरला होता. परंतु; ते लढले नाहीत. तर, आता ‘‘मी इतर मागासवर्गीय जागेवरून लढतो. तुम्ही सर्वसाधारण जागेवर नाना काटे यांच्याविरोधात लढा, ’’ असा प्रस्ताव जयनाथ काटे यांनी शत्रुघ्न यांच्याकडे ठेवला होता. पण यावेळीही शत्रुघ्न काटे व नाना काटे समोरासमोर आले नाहीत. दोघेही एकमेकांना लांब राहूनच आव्हान देताना दिसत आहेत.
यावेळीही शत्रुघ्न काटे यांनी इतर मागासवर्ग संवर्गातून ‘अ’ जागेवर; तर नाना काटे काटे यांनी सर्वसाधारण संवर्गात ‘ड’ मधून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. नेमकी शत्रुघ्न काटे यांना काय भीती वाटत आहे? की दोन्ही काटेंनी मॅनेजमेंटचे राजकारण करत सोयीस्कररित्या एकमेकांसमोर येण्याचे टाळले आहे? असे सवाल भाजपचे (BJP) कार्यकर्ते विचारत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.