Ajit Pawar On Bjp Sarkarnama
पुणे

Ajit Pawar On BJP : 'निविदा मॅनेज-रिंग' करून किमती वाढवल्या; अजितदादांचा अप्रत्यक्ष भाजपवर वार !

Chetan Zadpe

Pimpri Chinchwad News : पिंपरी-चिंचवडमधील मागच्या काळात थांबलेल्या विकासाला गती द्यायची आहे. गेल्या काही दिवसांत शहराच्या विकासाची बिघडलेली घडी आपल्याला पुन्हा बसवायची आहे. शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे, बऱ्याचदा विकासकामांच्या निविदा 'मॅनेज' करण्याचा प्रयत्न केला जातो. रिंग केली जाते. किमती वाढविल्या जातात. कारण नसताना नागरिकांचा कररूपाने आलेला पैसा चुकीच्या पद्धतीने खर्च करण्याची अलीकडे बरीच उदाहरणे पाहायला मिळतात, अशी अप्रत्यक्ष टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आकुर्डीतील कार्यक्रमात शुक्रवारी केली.

आकुर्डीतील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण झाले, त्यावेळी पवार बोलत होते. व्यासपीठावर आमदार अण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष अजित गव्हाणे, महिला अध्यक्ष कविता आल्हाट, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी उपमहापौर राजू मिसाळ, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष जगदीश शेट्टी, नाना काटे, मोरेश्वर भोंडवे, राजेंद्र जगताप, धनंजय भालेकर, पंकज भालेकर आदी उपस्थित होते.

अधूनमधून वेगळ्या प्रकारचे वातावरण करण्याचा प्रयत्न -

अजित पवार यांनी पुतणे आमदार रोहित पवार यांना टोला लगावला. पवार म्हणाले, "आता काहीजण अधूनमधून शहरात येत आहेत. वेगळ्या प्रकारचे वातावरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. १९९२ पासून २०१७ पर्यंत महापालिका ताब्यात असेपर्यंत सर्वांगीण विकासाची कामे केली आहेत. पक्षाच्या स्थापनेपासून शहरातील जनतेने मला, पक्षाला मोठी ताकद, प्रेम दिले. शहरावर माझे विशेष प्रेम आहे. त्यामुळे मला नेहमीच शहराबद्दल आपुलकी, प्रेम जिव्हाळा वाटत असतो.

शहराचा विकास व्हावा, यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न चाललेला असतो. १५ दिवसांपासून शहरातील कामांचा आढावा घेऊन गती देण्याचा प्रयत्न करत आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रामकृष्ण मोरे यांच्या निधनानंतर मी लक्ष घातले. कठोर निर्णय घेतले. रस्ते, पूल, पाणी योजना, शैक्षणिक सुविधा देत असताना शहराचे हित डोळ्यांसमोर ठेऊन निर्णय घेतले.

अलीकडे निविदा 'मॅनेज' करण्याचा प्रयत्न -

पवार म्हणाले, "महापालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना शहराचा नियोजनबद्ध विकास केला. सर्वात श्रीमंत महापालिका असा लौकिक होता. तो आता आपल्याला परत मिळवायचा आहे. त्यासाठी सगळ्यांना प्रयत्न करावे लागणार आहेत. बऱ्याचदा विकासकामांच्या निविदा 'मॅनेज' करण्याचा प्रयत्न केला जातो. रिंग केली जाते. किमती वाढविल्या जातात. कारण नसताना नागरिकांचा कररूपाने आलेला पैसा चुकीच्या पद्धतीने खर्च करण्याची अलीकडे बरीच उदाहरणे पाहायला मिळतात. झोपडपट्टीमुक्त शहर करायचे आहे. त्यासाठी सर्वांची साथ हवी आहे. मागच्या काळात थांबलेल्या विकासाला गती द्यायची आहे. रखडलेल्या प्रभागातील कामांना गती दिली जाईल.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT