pcmc
pcmc  Sarkarnama
पुणे

राज्यात पिंपरीचा डंका; ई-प्रशासनात ठरले अव्वल

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराने शहरी ई-प्रशासन निर्देशांक स्पर्धेत (e-governance index competition) राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पुणे, ठाणे, मुंबई आदी राज्यातील २७ महापालिकांत पिंपरी (PCMC) अव्वल ठरली आहे. त्याबद्दल महापौर उषा उर्फ माई ढोरे (Mayor Mayor Mai Dhore) यांनी सर्व नागरिकांचे मंगळवारी (ता.२५ जानेवारी) अभिनंदन केले. या सन्मानाने शहराच्या नावलौकिकामध्ये भर पडल्याचे त्यांनी सांगितले. तर, भविष्यामध्ये प्रशासनात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया महापालिका आयुक्त राजेश पाटील (PCMC Commissioner Rajesh Patil) यांनी दिली.

गेल्या दोन दशकांमध्ये पिंपरी-चिंचवडने आंतरराष्ट्रीय स्तरावर आयटी हब म्हणून एक नवीन ओळख प्रस्थापित केली आहे. त्या अनुषंगाने महापालिका प्रशासनामध्येही आमुलाग्र बदल होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेमध्ये सर्व स्तरांवर तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून नागरिकांना सुविधा देण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. प्रशासनामध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढल्यामुळे कामकाजामध्ये गतिमानता, पारदर्शकता आली. या बदलाचे वेळोवेळी स्वतंत्र संस्थांकडून मूल्यमापन करण्यात येते. पॉलीसी रिसर्च ऑर्गनायझेशन या स्वतंत्र संस्थेकडून राज्यामधील एकूण २७ महापालिकांचे नुकतेच ई-प्रशासनासंदर्भात सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये पिंपरी चिंचवडने ई-प्रशासन निर्देशांकामध्ये ५.९२ गुण प्राप्त करून अन्य २६ शहरांवर आघाडी घेतली.

पिंपरी पालिकेचे संकेतस्थळ आणि अॅप वेळोवेळी अद्ययावत करण्यात येते, कोरोना काळात पिंपरी-चिंचवडकरांना घरबसल्या नागरी सुविधांचा लाभ देण्यात आला. पालिकेच्या वतीने कोरोना साथीवर नियंत्रणासाठी ऑनलाईन कोविड डॅशबोर्ड, बेड्सची उपलब्धता माहिती दर्शक, लसीकरण नोंदणी व केंद्रांची माहिती अशा विविध सुविधा सुरु करण्यात आल्या. पाणीपुरवठा, आपत्कालीन सूचना इत्यादी विषयांमधील तातडीचे संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आले. करसंकलन, तक्रार निवारण, दाखले इत्यादी नागरी सुविधा संकेतस्थळ आणि अॅपवर उपलब्ध करून दिले गेले. सोशल मिडिया चॅनेल्सच्या माध्यमातून नागरिकांचे विविध विषयांवर प्रबोधन, तसेच, पालिकेशी संबंधित लोकोपयोगी बातम्या प्रसारित करण्यात आल्या. पालिकेचे संकेतस्थळ, अॅप आणि सोशल मिडिया चॅनेल्स या माध्यमातून प्रशासनाचा नागरिकांशी संवाद वाढविला गेला. नागरिकांच्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन त्यावर उचित कार्यवाही सुरु केली गेली.

पालिकेच्या सेवा अॅप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाइन झाल्यामुळे नागरिकांचा बहुमुल्य वेळ वाचत आहे. या वैशिष्ट्यांमुळे पिंपरी चिंचवडने ई-प्रशासनामध्ये आपला एक वेगळा ठसा उमटवला. त्याबद्दल नागरिकांकडून देखील समाधान व्यक्त केले जात असल्याचे महापौर व आयुक्तांनी सांगितले.

पॉलीसी रिसर्च ऑर्गनायझेशन या स्वतंत्र संस्थेकडून शहरी ई-प्रशासन निर्देशांकाची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे ई-प्रशासनाच्या अंमलबजावणी संदर्भात मूल्यमापन केले जाते. या संस्थेच्या वतीने स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकृत संकेतस्थळ, अधिकृत मोबाईल अॅप्लिकेशन आणि अधिकृत सोशल मिडिया चॅनेल्सची उपलब्धता, सेवा आणि पारदर्शकता इत्यादी मापदंडांच्या आधारे निर्देशांक अहवाल तयार करण्यात आला. त्या आधारे ही निवड करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT