Pimpri Police
Pimpri Police Sarkarnama
पुणे

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमधून औरंगबादसाठी तलवारींचे कुरिअर; पोलिसांकडून शस्त्रसाठा जप्त

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पिंपरी-चिंचवड, (Pimpri-Chinchwad) औरंगाबाद आदी महापालिकांच्या निव़डणुका (Municipal Election) होऊ घातल्या आहेत. त्या तोंडावर औरंगाबादमध्ये डीटीडीसी कुरिअर कंपनीतून तलवारींचा बेकायदेशीर साठा नुकताच (ता.३० मार्च) जप्त करण्यात आला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी (ता.१ एप्रिल) याच कुरिअर कंपनीच्या पिंपरी-चिंचवडमधील दिघीच्या गोदामातून तब्बल ९७ बेकायदेशीर तलवारी या पोलिसांच्या खबरदारीमुळे हाती लागल्या. पंजाबातून (Punjab) हा शस्त्रसाठा औरंगाबादला पाठविण्यात येत होता. पण, तेथे तो पोचण्यापूर्वीच पोलिसांनी (Pimpri Police) जप्त केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान, कुरिअरव्दारे महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान ऐवजच नाही, तर आता घातक शस्त्रेही पाठविण्यात येत असल्याचा धोक्याचा इशारा मिळाला आहे. दोन लाकडी बॉक्समधून या तलवारी, त्या ठेवण्यात येणाऱ्या नऊ म्यान आणि दोन कुकरी असा शस्त्रसाठा अमृतसरहून औऱंगाबादला पाठविण्यात येत होता. पण, एक्सरे स्कॅनिंगमुळे या बॉक्समध्ये भलतेच कुरिअर असल्याचे आढळून आले. औरंगाबादमध्ये डीटीडीसी कुरिअर कंपनीच्या कुरिअरमध्ये अवैध तलवारी मिळाल्याने पिंपरी- चिंचवडमधील दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप शिंदे हे आपल्या हद्दीतील सर्व कुरिअर कंपन्यांत गेले. त्यांनी कुरिअरव्दारे पाठविण्यात येणाऱ्या मालाची स्कॅनिंग करण्याची खबरदारी घेण्यास सांगितले. परिणामी डीटीडीसी कुरिअर कंपनीने आपल्या मालाचे स्कॅनिंग सुरु केले. त्यात त्यांना अमृतसर, पंजाब येथील उमेश सूद याने औरंगाबादच्या अनिल होन याला पाठविलेल्या दोन लाकडी बॉक्सच्या एक्सरे मशिनने केलेल्या तपासणीत तलवारसदृश वस्तू दिसून आल्या. त्यामुळे त्याबाबत दिघी पोलिसांना लगेच कळवण्यात आले.

त्यांनी ते बॉक्स पंचांसमक्ष उघडे असता त्यात ९२ तलवारी, दोन कुकरी आणि नऊ म्यान मिळून आल्या. तर, दोन दिवसांनी (ता.३ एप्रिल) याच कुरिअर कंपनीच्या अमृतसर, पंजाबमधूनच आलेल्या दुसऱ्या पार्सलमध्ये आणखी पाच तलवारी मिळून आल्या. त्या मनिंदर नावाच्या व्यक्तीने रहाता, नगर येथील आकाश पाटील याला पाठविल्या होत्या.

दरम्यान, या तलवारी पाठविणारे व त्या ज्यांना पाठविण्यात आलेल्या होत्या, अशा चौघांविरुद्ध दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. त्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने या तलवारी नेमक्या कशासाठी पाठविण्यात आल्या होत्या, त्याचा उलगडा झालेला नाही. ही कामगिरी केलेल्या दिघीच्या पोलिस पथकाला पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वीस हजार रुपयांचे बक्षीस देऊन त्यांचे जाहीर कौतूक आज (ता. ४ एप्रिल) केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT