Fire Brigade Sarkarnama
पुणे

साडेतेरा लाखांची बाईक विझवणार पिंपरीतील आग...

पिंपरी-चिंचवड महापालिका (PCMC) बाजारभावापेक्षा बाईक खरेदीसाठी दुपटीहून अधिक पैसे मोजणार आहे

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : आग लागली की डोळ्यासमोर उभा राहतो तो आगीचा बंब. पण अरुंद गल्लीबोळात आणि झोपडपट्यांतील आगीत तो शिरू शकत नसल्याने तेथील आग विझवताना अग्निशमन दलाला (Fire department) तारेवरची कसरत करावी लागते. तसेच, त्या आगीत अडकलेल्यांची सुटका करताना अग्निशमन जवानांच्या ( Fire Brigade) जीवावरही बेतते. म्हणून अशा ठिकाणच्या आगी विझवण्याकरिता आता परदेशाप्रमाणे तीन फायर फायटिंग मोटार बाईक पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) दाखल होणार आहेत. फक्त श्रीमंत पिंपरी पालिका (PCMC) त्यासाठी बाजारभावापेक्षा दुपटीहून अधिक पैसे मोजणार आहेत, एवढेच काय ते.

पेठांचे शहर असलेल्या पुण्यात अशा सात-आठ फायर बाईक आहेत. पण, त्यांच्या तुलनेत पिंपरीत येणाऱ्या या बाईक जास्त आधुनिक आहेत, असा दावा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दलाचे प्रमुख किरण गावडे यांनी रविवारी (ता.१६ जानेवारी) 'सरकारनामा'शी बोलताना केला. या बाईकचा दुहेरी उपयोग होणार आहे. जेथे आगीचा बंब पोचू शकणार नाही, तिथे त्या पोचतीलच. शिवाय वाहतूक कोंडीत न सापडता त्या वेगाने घटनास्थळी जाऊन लगेचच आग विझवणे सुरु करतील, असे ते म्हणाले.

प्रत्येक बाईकवर दोन जवान असणार आहेत. तसेच वीस, वीस लीटरच्या पाण्याच्या दोन टाक्या, पंप आणि शंभर फूटी पाईपही या बाईकसोबत राहणार आहे. झोपडपट्यांतील आग विझवताना तेथील रहिवाशांच्या ड्रमातील पाण्याचाही वापर या बाईकवरील पंप करू शकणार आहेत. तसेच, बंब आग विझवण्याची तयारी करण्यास पाचेक मिनिटे वेळ लागतो तयारीसाठी. तो या बाईकला लागणार नाही. ती स्टॅंडला लावून आग विझवण्याचे काम लगेचच सुरु होणार असल्याने आग लवकर आटोक्यात येईल. तसेच वित्त आणि मनुष्यहानीही होणार नाही, असा दावा पालिकेकडून करण्यात आला आहे.

४११ सीसीच्या या फायर बाईक बाजारात सहा लाख रुपयांपासून उपलब्ध आहेत. तर, पालिका अशा प्रत्येक बाईकसाठी साडेतेरा लाख रुपये मोजणार आहे. तसेच त्यासाठी निविदाही काढली जाणार नाही. तर, त्या मे. आरएमएस फायर सेफ्टी सर्व्हिसेस (इं) प्रा. लि.कडून थेट पद्धतीने विकत घेतल्या जाणार आहेत. स्थायी समितीच्या येत्या बैठकीत (ता.१९ जानेवारी) हा प्रस्ताव मंजूरीसाठी ठेवण्यात आलेला आहे. तो मंजूर झाल्यानंतर बाईकव्दारे आग विझवण्याचे आठ दिवसांचे प्रशिक्षण शहरातील अग्निशमन दलाच्या जवानांना दिले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT