PMC Election_Congress_Shivsena_MNS 
पुणे

PMC Election 2025: पुण्यात निवडणुकीचा नवा पॅटर्न! काँग्रेस, शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार

PMC Election 2025: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यामुळे मसनेच्या रूपाने नवा पक्ष आघाडीत समाविष्ट झाला आहे.

सरकारनामा ब्युरो

PMC Election 2025: महापालिका निवडणुकीत काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील आघाडीवर आज (सोमवार) शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यामुळे मसनेच्या रूपाने नवा पक्ष आघाडीत समाविष्ट झाला आहे. त्यामुळे पुणे शहरात एक नवा पॅटर्न या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाली होती. रविवारी रात्रीपासूनच काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) यांच्यात जागा वाटपाच्या बैठका सुरू होत्या. सोमवारी पहाटे शिवसेना आणि काँग्रेसमधील जागा वाटपाचा तिढा सुटला.

तर शिवसेना आणि मनसे यांच्यात यापुर्वीच युती झाली आहे. जागा वाटपात शिवसेनेला वाट्याला आलेल्या जागेतून मनसेला जागा देण्याचा पर्याय काढण्यात आला. त्यानुसार १६५ जागांपैकी काँग्रेसच्या वाट्याला १०० तर शिवसेनेला ६५ जागा आल्या आहेत. शिवसेनेच्या वाट्याच्या ६५ जागांपैकी २१ जागा मनसेला देण्याचा निर्णय शिवसेना आणि मनसे यांच्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून आघाडीत सुरू असलेल्या जागा वाटपाचा निर्णय अंतिम झाला. शिवसेना आणि काँग्रेस आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचे अधिकृत घोषणा दोन्ही पक्षांकडून सोमवारी दुपारी करण्यात आली.

त्यानंतर दोन्ही पक्षांकडून इच्छुकांना एबी फॉर्मचे वाटप सुरू करण्यात आले. आघाडीमध्ये समविचारी पक्ष सहभागी करून घेण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. समविचारी पक्ष आघाडीत आल्यानंतर त्यांना काँग्रेसच्या वाट्यातून जागा देण्याचे ठरले असल्याचे दोन्ही पक्षांकडून सांगण्यात आले.

१८ वर्षांनतर पॅटर्नमध्ये बदल

महापालिकेच्या २००७ मध्ये झालेल्या निवडणुकांनंतर काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी असा पुणे पॅटर्न अस्तित्वात आला होता. राज्यभरात या पॅटर्नची चर्चा झाली होती. आता १८ वर्षांनंतर पुन्हा एक नवा पॅटर्न महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने आला आहे. यापूर्वीच्या पुणे पॅटर्नमधील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला सोडून बाहेर पडली आहे. तर नव्या पॅटर्नमध्येशिवसेने आपली ‘मशाल’ काँग्रेसच्या ‘हाती’ दिली आहे. तर या दोन्हींच्या आडून मनसे पॅटर्नमध्ये सहभागी झाली आहे. त्यामुळे निवडणुकीत हा पॅटर्न किती यशस्वी होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

तिरंगी लढत होणार

एकीकडे काँग्रेस शिवसेना आघाडी, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष अशा तीन प्रमुख पक्ष रिंगणात उतरणार असल्याचे असे चित्र निर्माण झाले आहे. भाजप- शिवसेना युतीमधील जागा वाटपाचा वाद अद्याप मिटलेला नाही. त्यामुळे शिवसेना स्वतंत्र लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे. स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यास चौरंगी लढत होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT