PMC Election Latest News sarkarnama
पुणे

PMC Election 2025: पुण्यात अनुभवी माजी नगरसेवकांची दादागिरी! मतदारांची पळवापळवी? गुरुवारी जाहीर होणार प्रारूप मतदारयादी

PMC Election 2025: यामध्ये शहरातील काही अनुभवी माजी नगरसेवकांनी त्यांचे उपद्रवमूल्य वापरून मतदारांची पळवापळवी केली आहे.

ब्रिजमोहन पाटील

पुणे : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार याद्या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, उद्या (ता. ६) प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे. यामध्ये शहरातील काही अनुभवी माजी नगरसेवकांनी त्यांचे उपद्रवमूल्य वापरून मतदारांची पळवापळवी केली आहे. यामध्ये कसबा पेठ, हडपसर, खडकवासला, कोथरूड, वडगाव शेरी मतदारसंघातील प्रभागांमध्ये हे प्रकार घडल्याची असल्याची चर्चा रंगली आहे. असे प्रकार लक्षात येताच इच्छुक उमेदवारांनी सतर्क होऊन रोखण्यासाठी धावपळ केली आहे. मात्र, प्रशासनाने असे कोणतेही प्रकार घडले नसल्याचे द्यावा केला आहे.

पुणे महापालिकेची प्रभाग रचना अंतिम झाली असून, ४१ प्रभागांमधून १६५ नगरसेवक महापालिकेत निवडून दिले जाणार आहेत. ही प्रभाग रचना करताना २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या आधारमानून प्रभागांची रचना केली आहे. तर मतदारांसाठी १ जुलै २०२५ पर्यंतची नोंदणी वैध ठरविण्यात आली आहे. १ जुलै रोजी शहरातील आठ विधानसभा मतदारसंघ तसेच शिरुर, पुरंदर आणि भोर वेल्हा या तीन विधानसभा मतदारसंघातील शहरी भागातील मतदारांचा समावेश या निवडणुकीत केला आहे.

राज्य निवडणूक आयोगाने प्रभागनिहाय मतदारयाद्यांची फोड करण्यासाठी कार्यक्रम जाहीर केला. पुणे महापालिकेला १४ ऑक्टोबर रोजी मतदार यादी सुपूर्त केली. या मतदारयादीची प्रभागनिहाय फोड करून प्रारूप मतदारयादी जाहीर करण्यासाठी ६ नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली होती. गेल्या २० दिवसांपासून १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या स्तरावर मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. प्रभाग रचना मनासारखी झाली नाही तरी मतदार यादी स्वतःच्या मनासारखी करून घेण्यासाठी माजी नगरसेवक, इच्छुक उमेदवारांचा खटाटोप सुरू आहे. यासाठी क्षेत्रीय कार्यालयस्तरावरील मुकादम, सहाय्यक आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक यासह अन्य कर्मचाऱ्यांची मदत घेऊन प्रभागातील धोकादायक मतदार बाहेर काढणे आणि सोईच्या मतदारांची नावे प्रभागात समाविष्ट करण्याचे उद्योग सुरू आहेत. कात्रज, धनकवडी, बाणेर, बालेवाडी, कोंढवा, मंगळवार पेठ, कसबा पेठ, चंदननगर, वडगाव शेरी, येरवडा या भागात असे प्रकार करण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये निवडणुकीच्या निकालात फरक पडेल अशा पद्धतीने मतदारांच्या याद्यांची अदलाबदल करण्यात आली आहे. हा प्रकार घडल्यानंतर माजी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांकडे जाऊन तक्रारीही केल्याचे प्रकार घडले आहेत.

मतदारांची संख्या केली लाखाच्यावर

२०११ च्या जनगणनेनुसार प्रभाग रचना केल्याने प्रभागातील लोकसंख्या ही लाखाच्या आत आहे. पण मतदार याद्या या जुलै २०२५ पर्यंतची आहे. त्यामुळे बहुतांश सर्वच प्रभागातील मतदारांची संख्या ही लाखाच्या वर गेली आहे. काही प्रभागाची संख्या तर पावणेदोन लाखाच्या वर गेली आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोचताना उमेदवारांची धावपळ होणार आहे. "प्रारूप मतदार यादी तयार करताना योग्य पद्धतीने काम केले आहे. मुकादम व अन्य कर्मचाऱ्यांचे लॉगइन काढून घेण्यात आले आहे. प्रारूप मतदारयादीवर हरकती असतील तर त्या नोंदविण्यासाठी नागरिकांना मुदत दिली जाणार आहे," अशी माहिती निवडणूक शाखेचे उपायुक्तप्रसाद काटकर यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT