PMC Election 2025: पुणे महापालिकेसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगानं शुक्रवार, ३ ऑक्टोबर २०२५ रोजी मान्यता दिली. यानंतर आता शनिवार, रविवार सुट्टी आल्यानं तसंच ६ ऑक्टोबरची डेडलाईन आयोगाला देण्यात आल्यानं सोमवारी, ६ ऑक्टोबरला ही अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. पण या बदलामध्ये ८ प्रभागांची नाव बदलण्यात आली असून तब्बल साडेचार हजार हरकती या फेटाळण्यात आल्या आहेत. नेमका हा बदल काय झाला आहे? पाहुयात.
हरकतींनंतर बदल करण्यात आलेल्या प्रभागांमध्ये ८ प्रभागांचा समावेश असून या प्रभागांची नावं बदलण्यात आली आहेत.
प्रभाग क्र. १ - कळस-धानोरी (जुनं नाव) - कळस-धानोरी-उर्वरित लोहगाव (नवं नाव)
प्रभाग क्र. १४ - कोरेगाव पार्क-मुंढवा (जुनं नाव) - कोरेगाव पार्क-घोरपडी-मुंढवा (नवं नाव)
प्रभाग क्र. १५ - मांजरी बुद्रुक-साडेसतरानळी (जुनं नाव) - मांजरी बुद्रुक-केशवनगर-साडेसतरानळी (नवं नाव)
प्रभाग क्र. १७ - रामटेकडी-माळवाडी (जुनं नाव) - रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी (नवं नाव)
प्रभाग क्र. २० - बिबवेवाडी-महेश सोसायटी (जुनं नाव) - शंकर महाराज मठ- बिबवेवाडी (नवं नाव)
प्रभाग क्र. २४ - कमला नेहरु हॉस्पिटल (जुनं नाव) - रास्ता पेठ - कसबा गणपती - कमला नेहरु हॉस्पिटल - केईएम हॉस्पिटल (नवं नाव)
प्रभाग क्र. २६ - गुरुवार पेठ-घोरपडे पेठ (जुनं नाव) - घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी (नवं नाव)
प्रभाग क्र. ३८ - आंबेगाव-कत्रज (जुनं नाव) - बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज (नवं नाव)
दरम्यान, सुरुवातीला २२ ऑगस्ट २०२५ रोजी निवडणूक आयोगानं प्रारुप प्रभाग रचनेला मान्यता दिली होती. त्यानंतर ११-१२ सप्टेंबर २०२५ रोजी यावर मागवलेल्या हरकतींवर सुनावणी पार पडली. बालगंधर्व रंगमंदीर इथं पार पडलेल्या सुनावणीला फक्त ८०० नागरिक उपस्थित राहिले होते. तर एकूण ५,९२२ हरकती आल्या होत्या. यांपैकी ४,५२४ हरकती अमान्य करण्यात आल्या. तर १३२९ हरकती पूर्णतः मान्य झाल्या. तर ६९ हरकती या अंशतः मान्य करण्यात आल्या. या हरकतींनुसार, वर नमुद केलेल्या आठ प्रभागांमध्ये बदल करण्यात आले.
अनुसुचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे प्रभाग बदलणे, प्रभागाची नावं बदलणं अशा हरकतींचा यामध्ये समावेश होता. हरकती भरमसाठा आल्या पण प्रत्यक्षात ८०० नागरिकांनीच सुनावणीवेळी हजेरी लावल्यानं मोठी टीकाही झाली होती. पण प्रभागांना अंतिम स्वरुप देताना राज्य शासनानं नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी हरकती सुनावणीचा अंतिम अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्यानंतर राज्य शासनानं हा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडं सादर केला.
पुढे राज्य निवडणूक आयोगानं या अहवालावर अंतिम मोहोर उमटवली. त्यानंतर आता याचा शासकीय आदेश अर्थात जीआर सोमवार, ६ ऑक्टोबर रोजी निघेल, यामध्ये गॅझेट आणि नकाशे जाहीर केले जातील अशी माहिती निवडणूक शाखेचे उपायुक्त प्रसाद काटकर यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.