PMC Election 2025: विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने करत आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आता महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कथित मतचोरीबाबत सावध पवित्रा घेतला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील आगामी पुणे महापालिका निवडणुकांमध्ये मतांची चोरी रोखण्यासाठी मास्टर प्लॅन आखला आहे.
पुण्यातील पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी बूथ प्रमुखांना आणि पदाधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. पुण्यातील कार्यकर्ता आणि पदाधिकारी मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, "लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ हे लाखांमध्ये असतात. मात्र, बुथ प्रमुखाचा विचार केलास त्याच्याकडं 1 हजार मतदारांची जबाबदारी असते. एका मतदार यादीत एक हजार मतदार असतील तर 250 ते 300 घर असतील. प्रत्येक बूथप्रमुख मतदार यादीतील 250 घरे सांभाळू शकला तर आपण निवडणूक जिंकू शकतो"
मतदारयादीत बाहेरची अनधिकृत नावे घुसलीच नाहीत तर मतचोरी होणार नाही. बूथ प्रमुखानं निवडणूक आयोगाकडून मतदारयादी घ्यावी. मुंबईत एकेका पत्त्यांवर 50 नाव घुसवण्यात आली आहेत. पोलिंग एजंट बूथ प्रमुखाच्या टीम मधील पाहिजे. तो मतदार यादीतील नागरिकांना नावानिशी ओळखत असला पाहिजे. त्याने माणसं ओळखून बोगस मतदार समोर आणले पाहिजेत, असं केल्यास मतचोरी होणार नाही आणि त्याचा फटका आपल्याला बसणार नाही. अनेक ठिकाणी चोरी पकडण्यासाठी नाकाबंदी केली जाते, यामध्ये चोर सापडत देखील नाहीत. कारण नाकाबंदी पाहून अनेक चोर त्या वाटेला जात नाहीत तशाच पद्धतीनं मतचोरी रोखण्यासाठी आपण नाकाबंदी केल्यास पुढची लोक त्या वाटेला जाणारच नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
जर आपण मतचोरी रोखली तर आपण यांना गाडू शकतो, त्यामुळं नुसत्या घोषणा देऊन काही होणार नाही. तर प्रत्येक बूथ प्रमुखांनी कामाला लागणं आवश्यक आहे, अशा सूचना उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. लोकसभेला आपण जिंकलो मग विधानसभेला एवढा पराभव कसा होऊ शकतो? ही अशक्य गोष्ट आहे. लोकसभा ते विधानसभेदरम्यान 45 लाख लोकसंख्या महाराष्ट्रात घुसवण्यात आली आहेत. बोगस मतदार आपण शोधून काढले तरच आपण जिंकू शकतो. मला बूथ प्रमुखांची यादी पाहिजे, ही गोष्ट तुम्ही आणत नाहीत तोपर्यंत निवडणूक जिंकण्याच्या भानगडीत पडू नका. वाऱ्यावर निवडूका होत नाहीत. भाजपच्या हातून सत्ता गेली की लोक त्यांना शिल्लक ठेवणार नाहीत, हे त्यांना माहिती आहे. त्यामुळं कोणत्याही मार्गाने ते निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करणारच, असंही यावेळी उद्धव ठाकरे यांनी बुथप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सांगितलं.
मतदार यादीत घुसवण्यात आलेले मतदार पाहून त्यानं बाद करणं महत्वाचं आहे. हे काम सुरू केल्यानंतर आपण कसे जिंकत नाही, हे पाहू. एकदा बूथ प्रमुख किंवा गट प्रमुखांची रचना बांधून दिल्यावर 25 वर्षे आपली सत्ता कोणी हालवू शकणार नाही. विधानसभेच्या पराभवामध्ये ईव्हीएम हा तांत्रिक भाग आहेच. पण मतचोरी आपण थांबू शकतो. एका मतदार यादीसाठी बूथ प्रमुख आणि त्यांच्या टीमनं मतदार यादीत नाव आणि चेहऱ्यानिशी तपासायला लागलो, तर भाजपा निवडणूक लढण्याची हिंमत सुद्धा करणार नाही, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.