Pune News : रुग्णालयातील कथित अनियमिततांवर कारवाई न करण्यासाठी आणि वरिष्ठांकडे अहवाल पाठविण्याचे टाळण्यासाठी तब्बल २० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या पुणे महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. रुग्णालयाचे रजिस्ट्रेशन रद्द करण्याची धमकी देत लाचेची मागणी केल्याचा आरोप संबंधित अधिकाऱ्यावर आहे. धानोरीतील रुग्णालयात ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. या घटनेमुळे पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
डॉ. ज्ञानेश्वर शिवराम चकोर (वय ५०, वर्ग-२, नगर रोड क्षेत्रीय कार्यालय) असे अटक करण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी (२६ सप्टेंबर) पुणे एसीबीच्या पथकाने धानोरी येथील भैरवनगर परिसरात सापळा रचून ही कारवाई केली.
तक्रारदाराच्या रुग्णालयाच्या कामकाजाबाबत नगर रोड क्षेत्रीय कार्यालयात तक्रार अर्ज प्राप्त झाला होता. या तक्रारीची चौकशी करण्याची जबाबदारी डॉ. चकोर यांच्याकडे होती. १८ सप्टेंबर रोजी त्यांनी संबंधित रुग्णालयाची पाहणी केली होती.
या पाहणीदरम्यान रुग्णालयातील त्रुटी दूर न केल्यास रजिस्ट्रेशन रद्द करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. मात्र, हा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू नये आणि रुग्णालयावर कारवाई करू नये, यासाठी डॉ. चकोर यांनी तक्रारदाराकडे २० लाख रुपयांची मागणी केल्याचे एसीबीच्या तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात यापूर्वी ३० हजार रुपये दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतरही लाचेची मागणी सुरूच असल्याने रुग्णालय चालकाने एसीबीकडे धाव घेतली.
लाचेच्या मागणीला कंटाळून तक्रारदाराने २१ सप्टेंबर रोजी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणीत डॉ. चकोर यांनी स्वतःसाठी आणि 'साहेबांसाठी' ५० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यापूर्वी १५ हजार रुपये घेतल्याचेही तपासात समोर आले.
त्यानुसार २६ सप्टेंबर रोजी धानोरी येथील भैरवनगरमधील तक्रारदाराच्या रुग्णालयात एसीबीने सापळा रचला. दुपारी सुमारे १ वाजून ४७ मिनिटांनी डॉ. चकोर यांनी ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.
महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ
या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावानेही लाचेची मागणी झाल्याचे पडताळणीत समोर आल्याने या प्रकरणाच्या पुढील तपासाकडे लक्ष लागले आहे.
पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक नीता मिसाळ आणि सतीश वाळके यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.