Pune Anti Encroachment Drive, Naval Kishore Ram. Sarkarnama
पुणे

PMC News : पुणे पालिका आयुक्त 'ॲक्शन मोड'वर! ठेकेदारांचे टेन्शन वाढणार, 'त्या' अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होणार, निकृष्ट विकास कामांच्या...

PMC Naval Kishore : विकासकामांचे अंतिम बिल अदा करण्यापूर्वी दक्षता विभागाची तपासणी आता बंधनकारक असेल. यामध्ये केवळ तांत्रिक बाबीच नव्हे, तर वित्तीय मान्यता, कामाचा कालावधी, विमा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल पडताळणी केली जाणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News : शहरातील विकासकामांच्या दर्जा आणि रखडलेल्या कामांबाबत सातत्याने होणाऱ्या तक्रारींची महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी गंभीर दखल घेत प्रशासनावर कडक अंकुश आणला आहे. यापुढे विकासकामांची बिले काढण्यापूर्वी ‘थर्ड पार्टी’ गुणवत्ता तपासणी, कामाच्या प्रत्येक टप्प्याचे जिओ-टॅग छायाचित्रण आणि अंतिम बिलापूर्वी दक्षता विभागाची पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. कामाच्या दर्जात तडजोड किंवा मोजमापात अनियमितता आढळल्यास संबंधित अभियंत्यांवर थेट शिस्तभंगाची कारवाई करण्याचा खणखणीत इशारा आयुक्तांनी दिला आहे.

नागरिक आणि विविध संस्थांकडून महापालिकेच्या विकासकामांच्या गुणवत्तेवर आणि वेळेत काम पूर्ण होत नसल्याबद्दल सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी प्रशासनाला जबाबदारीच्या कचाट्यात आणणारे कठोर आदेश जारी केले आहेत. त्यानुसार प्रत्येक विकासकामाची बाह्य संस्थेमार्फत गुणवत्ता तपासणी केली जाणार असून, या प्रक्रियेसाठी सल्लागार कार्यालयाने तातडीने कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काम सुरू होण्यापूर्वी, सुरू असताना आणि पूर्ण झाल्यानंतर असे सर्व टप्पे टिपले जाणे आवश्यक राहणार आहे.

कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत थेट जबाबदारी निश्चित

नव्या नियमावलीनुसार कामाच्या गुणवत्तेची आणि अचूक मोजमापाची १०० टक्के जबाबदारी संबंधित अभियंत्यांवर निश्चित करण्यात आली आहे. कनिष्ठ अभियंत्यांना अक्षांश-रेखांशासह (जिओ-टॅग) छायाचित्रे नोंदवणे बंधनकारक असेल, तसेच मोजमाप पुस्तिकेत अचूक नोंदी कराव्या लागतील.

केवळ कनिष्ठ अभियंत्यांवर खापर फोडून वरिष्ठ अधिकाऱ्यांना यातून मोकळे होता येणार नाही. उपअभियंता, कार्यकारी अभियंता, सहाय्यक आयुक्त, अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता यांनाही प्रत्यक्ष कामांची पाहणी करून गुणवत्तेची खातरजमा करावी लागणार आहे. याशिवाय अतिरिक्त आयुक्तांनी त्यांच्या अखत्यारीतील काही कामांची निवड करून स्वतः तपासणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

अंतिम बिलापूर्वी दक्षता विभागाचा 'ब्रेक'

विकासकामांचे अंतिम बिल अदा करण्यापूर्वी दक्षता विभागाची तपासणी आता बंधनकारक असेल. यामध्ये केवळ तांत्रिक बाबीच नव्हे, तर वित्तीय मान्यता, कामाचा कालावधी, विमा आणि इतर आवश्यक कागदपत्रांची सखोल पडताळणी केली जाणार आहे. कामाच्या गुणवत्तेत त्रुटी, कामाची पुनरावृत्ती, मोजमापातील अनियमितता अथवा आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन आढळल्यास कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत ज्याची जबाबदारी निश्चित होईल, त्याच्यावर नियमानुसार कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT