

Pune News : पुणे महापालिका प्रशासनाकडून अतिक्रमण आणि अनधिकृत फ्लेक्सविरोधात धडक कारवाई सुरू असतानाच, आता थेट महापालिकेतील वरिष्ठ पदाधिकारीच प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. महापौर मंजूषा नागपुरे यांच्या फ्लेक्सचा फोटो शेअर करत घरचा आहेर दिल्यानंतर, आता महापालिकेतील काँग्रेसचे गटनेते रामचंद्र ऊर्फ चंदू शेठ कदम यांच्या फ्लेक्सवरूनही प्रशासनाने उपहासात्मक टोला लगावल्याचे समोर आले आहे.
शहर विद्रूपीकरण रोखण्यासाठी महापालिकेने 'शहर विद्रूपीकरण पुरस्कार २०२६' ही मोहीम हाती घेतली असून, सामान्य नागरिकांनाही अनधिकृत फ्लेक्सची तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना पुरस्कार देण्यात आल्यानंतर, महापालिकेच्या अधिकृत पीएमसी केअर या एक्स हँडलवरून पदाधिकाऱ्यांचे फ्लेक्स शेअर करत कारवाईचा इशारा दिला जात आहे.
महापौरांच्या विकासनिधीतून सुरू असलेल्या ड्रेनेज कामाच्या माहितीसाठी लावलेल्या फ्लेक्सचा फोटो शेअर करत महापालिकेने त्यांच्यावर निशाणा साधला होता. ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू असल्याने नागरिकांना होणाऱ्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करणारा हा फ्लेक्स लावण्यात आला होता, ज्यावर महापौरांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांचे मोठे फोटो होते. त्यावर प्रशासनाने "ड्रेनेजची तसदी समजू शकतो. फ्लेक्सची तसदी कशाबद्दल?" असा बोचरा सवाल करत थेट महापौरांचेच कान टोचले होते.
याच धर्तीवर आता काँग्रेसचे गटनेते चंदू शेठ कदम यांचाही फ्लेक्स प्रशासनाने ट्विट करत तो अनधिकृत असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. आम्हाला पाहिजे क्लस्टर योजना, आम्ही नागरिकांच्या सोबत अशा आशयाचा मजकूर या फ्लेक्सवर होता. यावर महापालिकेच्या ट्विटर हँडलवरून आम्ही नागरिकांच्या सोबत... हो, फोटोही नागरिकांनीच पाठवला" अशी उपहासात्मक टीका करत प्रशासनाने चिमटा काढला आहे.
सामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या प्रशासनाने महापौरांच्या फ्लेक्सवर बोट ठेवल्यानंतर आता काँग्रेस गटनेत्यालाही लक्ष्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, महापालिकेच्या या आक्रमक पवित्र्याचे पुणेकरांनी सोशल मीडियावर जोरदार स्वागत केले आहे.
परत एकदा घरचा आहेर, कोणत्याही दबावाला बळी पडू नका, कुणालाही सोडू नका, हे राजकारणी घडा शिकण्यास पात्र आहेत, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी पीएमसी केअरच्या ॲडमिनचे कौतुक केले आहे. कायदा सर्वांना समान असल्याचा संदेश प्रशासनाने दिला असला, तरी आता शहरात अनधिकृत फ्लेक्सवरील ही कारवाई पुढे किती आक्रमक होणार आणि याला राजकीय वळण कसे मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे