PMPML Recruitment 2026: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच १५०० नवीन बसेस दाखल होणार असून, या गाड्यांचे संचालन प्रभावीपणे करण्यासाठी तब्बल ४ हजार चालक आणि वाहकांची कंत्राटी पद्धतीने मेगाभरती केली जाणार आहे. यामध्ये २ हजार चालक आणि २ हजार वाहक अशी पदे भरली जाणार असून, यामुळे हजारो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
शहराचा वाढता विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता सध्या अनेक मार्गांवर बसगाड्या अपुऱ्या पडत आहेत. हीच कमतरता भरुन काढण्यासाठी महामंडळाने चालू वर्षात १५०० नवीन गाड्या खरेदी करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, गाड्या वाढवताना त्यांचा कारभार सुरळीत चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची गरज लागणार आहे.
या पार्श्वभूमीवर महामंडळाने तातडीने पावले उचलत ४ हजार चालक-वाहकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी आवश्यक असलेली निविदा प्रक्रिया महामंडळाने पूर्ण केली असून, कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीसाठी अधिकृत आणि सक्षम एजन्सीची नियुक्ती अंतिम टप्प्यात आहे. ही नियुक्ती पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला वेग दिला जाणार आहे.
पुणेकरांचा प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि गतिमान करण्यासाठी आम्ही ताफ्यात नवीन बस आणत आहोत, अशी माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकिय संचालक महेश आव्हाड यांनी दिली. या गाड्यांचे संचलन योग्य रीतीने व्हावे यासाठीच ही भरती केली जात असून, पुरेशी चालक-वाहक संख्या उपलब्ध झाल्यामुळे बस फेऱ्या चुकणार नाहीत आणि प्रवाशांना वेळेत व दर्जेदार सेवा देणे शक्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
या मेगाभरतीमुळे पीएमपीच्या सेवेचा दर्जा तर सुधारेलच, शिवाय ४ हजार बेरोजगार तरुणांना नोकरी मिळणार आहे. नवीन चालक-वाहकांच्या नियुक्तीनंतर मार्गावरील बसेसच्या फेऱ्या वाढतील आणि प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.