PMRDA elections Voting sarkarnama
पुणे

'पीएमआरडीए'च्या निवडणुकीत लांडगेंपेक्षा, जगतापांचे पारडे जड

नियोजन समितीच्या ३० जागांसाठी हे मतदान झाले.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : 'पीएमआरडीए'च्या नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी बुधवारी (ता.१०) पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad) ९५ टक्के मतदान झाले. शहराचे कारभारी भाजप (BJP) आमदार लक्ष्मण जगताप हे महापालिका मुख्य इमारतीत ठाण मांडून बसल्याने भाजपच्या ७५ च्या ७५ नगरसेवकांनी मतदान केले. म्हणजे त्यांचे शंभर टक्के मतदान झाले. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा (NCP) एकेक नगरसेवक गैरहजर राहिल्याने एकूण मतदान, मात्र ९५ टक्के झाले. दुसरीकडे मावळ तालुक्यात शंभर टक्के मतदान झाले. पालिका निवडणुक जाहीर होईपर्यंत म्हणजे जेमतेम दोन महिनेच निवडून येणाऱ्या या २२ जणांना काम करता येणार आहे.

नियोजन समितीच्या ३० जागांसाठी हे मतदान झाले. त्यातील २२ जागा पुणे आणि पिंपरी पालिका हद्दीत, एक नगरपालिका क्षेत्रासाठी, तर सात ग्रामपंचायत हद्दीकरिता आहेत. महापालिकेच्या २२ जागांसाठी २३ उमेदवार असल्याने निवडणूक बिनविरोध झाली नाही. पुणे महापालिका हद्दीत एका कॉंग्रेस उमेदवारामुळे मतदान घ्यावे लागले. दरम्यान, पिंपरी पालिका हद्दीतील ९ जागांसाठी भाजपचे सहा (सभागृह नेते नामदेव ढाके, चंद्रकांत नखाते, संदीप कस्पटे, निर्मला गायकवाड, वसंत बोराटे, जयश्री गावडे), तर विरोधी पक्ष राष्ट्रवादीकडून तीन नगरसेवक (अजित गव्हाणे, डॉ. वैशाली घोडेकर, मोरेश्वर भोंडवे ) उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे तीन उमेदवार हे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप, तर दोन उमेदवार हे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या मतदारसंघातील आहेत. दोन्ही आमदारांनी आपल्या कट्टर समर्थकांनाच येथे उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने पिंपरी, भोसरी आणि चिंचवड अशा शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील एकेका नगरसेवकाला संधी दिली आहे.

दरम्यान, या मतदानासाठी स्थायी समितीची काल (ता.१०) होणारी साप्ताहिक बैठक आजपर्यंत (ता.११) पुढे ढकलण्यात आली होती. कारण ही सभा होत असलेल्या मधुकराव पवळे सभागृहातच मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच त्यासाठी हे सभागृह असलेला पालिका मुख्यालयाचा संपूर्ण तिसरा मजला पूर्ण सीलच करण्यात आला होता. त्यामुळे या मजल्यावर दालन असलेले महापौर, विरोधी पक्षनेते व सत्तारुढ पक्षनेते यांनाही त्यांच्या कार्यालयात काल जाता आले नाही. मतदार नगरसेवक वगळता कुणालाच तिसऱ्या मजल्यावर प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे मतदानाच्या नियोजनासाठी आलेले जगताप यांनाही दुसऱ्या मजल्यावरील विधी समिती सभापतींच्या दालनात ठिय्या मांडावा लागला.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनीही याच मजल्यावरून मतदान अधिक कसे होईल, हे पाहिले. मात्र, त्यांच्या नगरसेविका आणि शहराध्यक्षा वैशाली घोडेकर या शहराबाहेर होत्या. त्यांचे विमान चुकले आणि मतदान हुकले. त्यामुळे भाजपसारखे त्यांचे शंभर टक्के मतदान झाले नाही. तर, शिवसेनेचे अमित गावडे हे सुद्धा नियोजित कामासाठी त्यांच्या शहरप्रमुखांना सांगून बाहेरगावी गेले होते. पालिकेत १२८ नगरसेवक आहेत. त्यापैकी सत्ताधारी भाजप आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन नगरसेवकांचा अकाली मृत्यू झालेला आहे. त्यातील भाजपचे एक आणि राष्ट्रवादीच्या दोघे कोरोनाला बळी पडले आहेत. तर, भाजपच्या एका नगरसेविकेचा डेगीने अकाली मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे १२४ पैकी १२२ जणांनी मतदान केले. पिंपरीसह पुणे पालिकेतील सर्वच उमेदवारांच्या विजयाची औपचारिकताच काय ती बाकी आहे. उद्या मतमोजणीतून निकाल हाती येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT