‘पीएमआरडीए’ निवडणूक सरकारनामा
पुणे

PMRDA निवडणूक : भाजपा-राष्ट्रवादीचा अपेक्षेप्रमाणे विजय; कॉंग्रेसची नाचक्की

आज झालेल्या मतमोजणीत कॉंग्रेसच्या उमेदवाराला मतांचा कोटादेखील पूर्ण करता आला नाही.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : पुणे महानगर नियोजन समितीच्या (पीएमआरडीए) बहुचर्चित निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्व १४ तसेच राष्ट्रवादीचे सर्व सात व शिवसेनेच्या एका उमेदवाराचा विजय झाला.नागरी गटातून काँग्रेसच्या एकमेव उमेदवार चंदूशेठ कदम यांचा पराभव झाला आहे.त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न करता उमेदवार उभा करणाऱ्या काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

आज झालेल्या मतमोजणीत कॉंग्रेसच्या उमेदवाराला 12 मतांचा कोटादेखील पूर्ण करता आला नाही. पुणे महानगर नियोजन समितीच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड नागरी क्षेत्रात असलेल्या २२ जागांसाठी ही निवडणूक झाली. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या संख्याबळानुसार २२ जागामध्ये राष्ट्रवादीचे सात, भाजपाचे १४ आणि शिवसेनेचा एक सदस्य मतांच्या कोटयानुसार निवडून आला.

पिंपरीत काँग्रेसचा एकही नगरसेवक नाही. पुण्यात १० नगरसेवक आहेत. संख्याबळ पाहता कॉंग्रेसचा एकही सदस्य निवडून येणे शक्य नव्हते. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी ग्रामीण गटातून जिल्ह्यात काँग्रेसला एक जागा देऊ केली केली होती. मात्र, काँग्रेसच्या काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी पवारांचा हा प्रस्ताव धुडकावून पुण्यातील नगरसेवक चंदूशेठ कदम यांचा उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध न होता मतदान घ्यावे लागले.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या नगरसेवकांना फोडण्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वल्गना हवेतच विरल्या. विरोधकांचे दिवास्वप्न भंगले असून. मुंगेरीलाल के हसीन सपने असेच त्याचे वर्णन करावे लागेल अशी प्रतिक्रिया भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी व्यक्त केली.

पुणे महानगर नियोजन समितीच्या सदस्यपदाच्या निवडणुकीत भाजपाने 22 पैकी 14 जागांवर विजय मिळविला. भाजपाने उभे केलेले सर्व उमेदवार विजयी झाले. त्यानंतर मुळीक बोलत होते.मुळीक म्हणाले, ‘‘ राज्यातील महाविकास आघाडीच्या भ्रष्ट कारभाराला राज्यातील जनता कंटाळली आहे. सरकारविरोधात प्रचंड संताप आहे. पुण्याच्या विकासासाठी राज्य सरकारला गेल्या दोन वर्षात एकही काम करता आलेले नाही. याची जाणीव नगरसेवकांमध्ये पण आहे. पुणेकरांचा विश्वास भाजपाने केलेल्या विकासकामांवर असून शहराचा विकास करण्यासाठी आवश्यक दूरदृष्टी आणि क्षमता भाजपामध्ये आहेत याची नगरसेवकांना जाणीव आहे त्यामुळेच सर्व पक्षाशी एकनिष्ठ राहणार आहेत.’’

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT