PMRDA sarkarnama
पुणे

पीएमआरडीए निवडणुकीत राष्ट्रवादीला भाजपपेक्षा अधिक मते!

राष्ट्रवादीत प्रवेशासाठी भाजपचे अनेक नगरसेवक इच्छूक असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (PMRDA) नियोजन समितीच्या निवडणुकीचा शुक्रवारी (ता.१२) निकाल लागला. भाजपने एकूण ३० एकूण पैकी १६ जागा जिंकल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) १२ जागा मिळाल्या. दोन पालिका क्षेत्रातील २२ पैकी १४ जागा भाजपने (BJP) पटकावल्या. तर, राष्ट्रवादीने सात जिंकल्या. सर्वाधिक (३० पैकी २२) जागा असलेल्या समितीच्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही महापालिका या मोठ्या नागरी मतदारसंघाचा विचार करता पिंपरी पालिकेत सत्ताधारी भाजपच्या उमेदवारांना अपेक्षेपेक्षा कमी मते मिळाली. तर, राष्ट्रवादीच्या तिन्ही उमेदवारांना चांगली मते मिळाली. त्यावर हा भाजपला मोठा धक्का असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे. भाजप आता अस्ताकडे झुकली आहे, अशी प्रतिक्रिया या निकालानंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे‌ पाटील यांनी रविवारी (ता.१४) दिली.

राष्ट्रवादीत प्रवेशासाठी भाजपचे अनेक नगरसेवक इच्छूक असल्याचे या निकालातून स्पष्ट झाले आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नेस्तनाबूत होऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्त्वाखाली पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येईल. शहराला पुन्हा विकासाची दिशा मिळेल, असा दावा वाघेरेंनी केला. भाजपमध्ये पारदर्शक कारभाराचा टेंभा मिरविणा-यांचा भ्रमाचा भोपळाही यानिमित्ताने फुटल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे महानगर नियोजन समितीच्या ३० जागांसाठी १० तारखेला पिंपरी-चिंचवडमध्ये ९५ टक्के मतदान झाले. शुक्रवारी (ता.१२) निकाल हाती आला. पिंपरी पालिकेतील भाजपचे सहा, तर राष्ट्रवादीचे तीन नगरसेवक या समितीचे सदस्य म्हणून निवडून आले. या निकालानंतर पालिकेतील सत्ताधारी भाजपवर टिका करताना वाघेरे‌ म्हणाले की, "पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत आहे. त्यांच्या प्रत्येक उमेदवाराला १३ मतांचा कोटा असताना सहा सदस्यांना कोट्यापेक्षा आठ मते कमी पडली. सत्तेच्या जोरावर त्यांनी चुकीचे निर्णय घेऊन ते लादले आहेत. सत्तेच्या मस्तीमुळे ते, त्यांचे नेते, कारभा-यांनी कोणत्याही निर्णयाचे आत्मपरिक्षण केले नाही. परिणामी, सत्ताधारी भाजपच्या या कारभाराला पक्षातील अनेक नगरसेवक वैतागलेले आहेत. त्याचा हा परिणाम आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, या निवडणुकीत भाजपमधील नगरसेवक फुटण्याची भाकिते खोटी ठरल्याचे पिंपरी-चिंचवड शहर भाजपने या निकालानंतर सांगितले. शहर भाजपचा अभेद्य गड कायम असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. राम, लक्ष्मण ( आ. महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप) जोडीचा शहराच्या राजकारणात करिष्मा कायम असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, भाजपच नाही, तर राष्ट्रवादीच्याही काही उमेदवारांना पहिल्या फेरीत विजयी होण्यासाठी ठरवून दिलेला १३ मतांचा कोटा पार करता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण दोन्ही पालिकांतील बाद झालेल्या नऊ नगरसेवकांच्या मतांचा फटका या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना पहिल्या फेरीतच विजयी होण्यात बसला. मते बाद झाली, असली, तरी ती फुटली नाहीत. म्हणजे राष्ट्रवादीच्या नगरसेवक मतदारांनी भाजपच्या नगरसेवक उमेदवाराला मतदान केले नाही वा त्याउलटही झालेले नाही. परिणामी या दोन्ही पक्षांचे सर्व उमेदवार निवडून आले आहेत. फक्त त्यातील काहींना दुसऱ्या फेरीची वाट पहावी लागली, एवढेच.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT