PCMC Auto Strike News  
पुणे

PCMC News : रिक्षाचालकांच्या आंदोलनाचा दणका; बेकायदेशीर बाईक टॅक्सी कंपनीविरुद्ध पोलिसांची कारवाई

आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन रिक्षाअभावी प्रवाशांचे मोठे हाल झाले होते.

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpri-Chinchwad News | पिंपरी-चिंचवडसह पुण्यातील बेकायदेशीर बाईक टॅक्सी सेवेला विरोध या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी या दोन्ही शहरांतील रिक्षाचालकांनी काल (ता.२८) संप (Strike) केला. आंदोलन करीत त्यांनी पुणे (Pune) आरटीओ कार्यालयावर रिक्षांचा धडक मोर्चा काढत चक्काजाम आंदोलन केले. त्याचा लगेचच परिणाम होऊन ही अवैध बाईक टॅक्सीसेवा पुरविणाऱ्या `रॅपिडो` कंपनीविरुद्ध लगेचच गुन्हा दाखल झाला.

दरम्यान, योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन मिळताच हे बेमूदत चक्काजाम आंदोलन दोन्ही शहरातील रिक्षा संघटनांनी कालच तूर्त स्थगित केले. मात्र,त्यांच्या या आंदोलनामुळे मोठी वाहतूक कोंडी होऊन रिक्षाअभावी प्रवाशांचे मोठे हाल झाले होते.

रोपन ट्रान्स्पोर्टेशन प्रा.लि. तथा `रॅपिडो` या पुणे येथे कार्यालय असलेल्या कंपनी अॅप बेस्ड बाईक टॅक्सी सेवा विनापरवानगी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या पावणेदोन वर्षांपासून देत होती. त्याचा फटका रिक्षा आणि टॅक्सीचालकांना बसत होता. म्हणून ते व त्यातही रिक्षावाले हे फेब्रुवारी २०२१ पासून `रॅपिडो`विरोधात आंदोलन करीत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी त्यांनी आरटीओकडे अनेकदा निवेदनेही दिली आहेत. पण, ठोस कारवाई झाली नव्हती.

परिवहन आय़ुक्तांच्या ३ सप्टेंबर २०२२ च्या आदेशांतर पिंपरी-चिंचवड आरटीओने नऊ `रॅपिडो` बाईकविरुद्ध जुजबी कारवाई केली होती. त्यामुळे दोन्ही शहरातील रिक्षा संघटनांनी अखेर चक्का जामचा अखेरचं हत्यार उपसलं होतं.त्यानंतर पिंपरी-चिंचवड आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक तानाजी शिवाजी धुमाळ यांनी कालच भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात `रॅपिडो`विरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी या कंपनीविरुद्ध भारतीय दंड संहिता, आयटी अॅक्ट आणि मोटार वाहन कायदा अशा तीन कायद्यांच्या विविध कलमांनुसार गुन्हा कालच दाखल केला. अवैध बाईक टॅक्सी चालवून स्वताचा आर्थिक फायदा करून घेतल्याचा आरोप `रॅपिडो`कंपनीवर ठेवण्यात आला आहे. अशी सेवा चालवून त्याव्दारे रिक्षा,टॅक्सीचालक आणि शासनाची या कंपनीने फसवणूक केल्याचेही या एफआयआरमध्ये म्हटले आहे.एपीआय पांचाळ पुढील तपास करीत आहेत.

`रॅपिडो`कंपनी ही प्रवासी वाहतूक ही बाईकव्दारे विनापरवानाच करीत होती. एवढेच नाही,तर त्यासाठी ते वापरीत असलेले अॅपही बेकायदेशीरच होते. म्हणून या कंपनीवर कारवाई करावी,यासाठी आरटीओने राज्य पोलिसांच्या सायबर विभागालाही पत्र दिले आहे. बाईक टॅक्सी योजना राज्यात सुरु होईपर्यंत आपण सेवा देणार नाही,असे या कंपनीने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते. तसेच त्यानंतर त्यांच्या या परवानगीचा अर्ज प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने (आरटीए) फेटाळलाही होता. तरीही, त्यानंतर या कंपनीची ही बाईक टॅक्सी सेवा बेकायदेशीरपणे सुरुच होती,हे विशेष.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT