Krishna prakash
Krishna prakash Sarkarnama
पुणे

Krishna Prakash यांनी वेषांतर करून गुन्हेगाराला दाखवला हिसका...

उत्तम कुटे: सरकारनामा

पिंपरी : पोलिस आयुक्त म्हणून पिंपरी-चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) आल्यानंतर कृष्णप्रकाश (CP Krishna prakash) यांनी वेषांतर करून पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना पोलिस कशी वागणूक देतात, याची पाहणी केली होती. त्यानंतर रविवारी (ता.२६ मार्च) त्यांनी पुन्हा वेष बदलून आपल्या तसेच मुंबईचे पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नांगरे-पाटील (Vishwas Nangre-Patil) यांची ओळख असल्याचे सांगून खंडणी उकळीत फसवणूक करणाऱ्या रोशन संतोष बागूल (रा. देहूगाव,ता.हवेली,जि.पुणे,मूळ रा.सोनजाब,ता.दिंडोरी,जि.नाशिक) याच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांच्या सायबर सेलमध्ये काम करीत असल्याचे बनावट ओळखपत्र त्याच्याकडे मिळाले आहे. तो हॅकर्स असल्याचा संशय असून त्याच्या टोळीत काहीजण आहेत.

गायत्री रोशन बागूल (वय २२) आणि पूजा विलास माने (वय २२, दोघीही रा. देहूगाव) या बागूलच्या दोन साथीदार तरुणींनाही देहूरोड पोलिसांनी अटक केली आहे. त्या दोघीही आपल्या पत्नी असल्याचे त्याने सांगितले आहे. त्याच्या गोल्डन टोळीतील अजित हाके आणि ज्ञानेश्वर हे, मात्र फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.

जमिनीची मॅटर सॉल्व करतो, असे सांगत नांगरे नाशिकला पोलिस आयुक्त असताना त्यांच्या जमिनीची कामे मीच केल्याची बढाई त्याने मारली होती. कृष्णप्रकाश हे ही ओळखीचे आहेत, अशी शेखी सध्या तो मिरवत होता. त्यामुळे त्याच्या मुसक्या आवळण्याचे आयुक्तांनी ठरवले. त्यासाठी निगडीतील पूना गेट हॉटेलमध्ये सापळा लावण्यात आला. त्यात बागूल नेमका अडकला. यापूर्वी त्यांनी आपल्या नावाचा गैरवापर करणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची वाहतूक शाखेत बदली केली आहे. तर, अशा एका पत्रकारालाही चार हात दूर ठेवले आहे. तरीही त्यांच्या नावाचा गैरफायदा त्यांच्या जवळील काही व्यक्ती घेत असल्याची चर्चा सुरुच आहे.

चिखली येथील प्रि-स्कूल चालक विन्सेट अलेक्झांडर जोसेफ (वय ५२) यांच्या मदतीने आयुक्त कृष्णप्रकाश यांनी ही कारवाई केली. जोसेफ हे या खंडणी व फसवणुकीच्या गुन्ह्यातील फिर्यादी आहेत. बागूल आपल्या नावाचा गैरवापर करीत असल्याचे समजल्याने कृष्णप्रकाश यांनी त्याला पकडण्याची योजना आखली. त्यासाठी दोन भावांत जमिनीवरून वाद असल्याची स्टोरी तयार करण्यात आली. त्यातील एक भाऊ बनून कृष्णप्रकाश हे बागूलला भेटायला गेले होते. त्याकरिता बागूलचे घरमालक जोसेफ यांची मदत घेण्यात आली. कारण ते बागूलचे घरमालक असल्याने त्यांच्यावर विश्वास ठेवूनच तो हे डील करायला आला होता. हे काम करून देण्यासाठी त्याने जोसेफ याच्यामार्फत आलेला हा दोन भावांचा दिवाणी स्वरुपाचा वाद आयुक्तांमार्फत सोडवून देण्याचे गाजर दाखवले होते. मात्र, त्यासाठी आयुक्तांना तीन लाख रुपये द्यावे लागतील, असे त्याने सांगितले. नंतर एक लाखावर तडजोड झाली. ते घेण्याकरिता तो आला होता. या नोटांच्या बंडलात वरखाली फक्त आठ हजाराऱ्या खऱ्या व बाकीच्या खेळण्यातील नोटा होत्या.

बागूल हा जोसेफ यांना घरभाडे न देता उलट त्यांनाही मोठ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या ओळखी असल्याचे सांगून धमकावत होता. त्यांचा फ्लॅट त्याने पोलिस असल्याचे सांगूनच भाड्याने घेतला होता. त्याच्याविरुद्ध सोसायटीच्या रहिवाशांच्याही तक्रारी होत्या. चऱ्होलीतील तापकीर नावाच्या व्यक्तीलाही त्याने अगोदर फसवलेले आहे. इतर अनेकांनाही त्याने गंडा घातल्याचा पोलिसांचा संशय आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT