Naresh Arora: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राजकीय प्रचार मोहिमांचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘डिझाईन बॉक्स’ कंपनीच्या पुण्यातील कार्यालयात गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी (ता. १३) चौकशी केली. मात्र, प्राथमिक तपासात कोणताही गैरप्रकार, आक्षेपार्ह बाब आढळून आली नसल्याचे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
या कारवाईनंतर शहरात विविध तर्कवितर्क लढविले जात होते. या संदर्भात पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘‘काही तोंडी तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांची पडताळणी करण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक संबंधित ठिकाणी पाठविण्यात आले होते. पथकाने पाहणी करून माहिती संकलित केली. तपासादरम्यान कोणतीही आक्षेपार्ह बाब आढळून आली नाही. त्यामुळे चौकशी पूर्ण करून पथक परतले’’
यासंदर्भात प्रतिक्रिया देताना ‘डिझाईन बॉक्स’चे सहसंस्थापक नरेश अरोरा म्हणाले, ‘‘गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. पोलिसांनी कार्यालयातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक कामकाजाबाबत विचारणा केली. पोलिसांनी कोणतीही कागदपत्रे नेली नाहीत. जर येथे पैशांचे वाटप किंवा बेकायदेशीर काही सुरू असते, तर निश्चितच काहीतरी आढळले असते; मात्र तसे काहीही सापडलेले नाही. मी राजकीय व्यक्ती नाही. गेली दहा वर्षे प्रामाणिकपणे काम करत असून, कधीही चुकीचे काम केलेले नाही. आम्ही पोलिसांना पूर्ण सहकार्य करू.’’
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी याबाबत ‘एक्स’वर भूमिका स्पष्ट केली. ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कार्यरत नरेश अरोरा यांच्या ‘डिझाईन बॉक्स’च्या कार्यालयात गुन्हे शाखेचे अधिकारी माहिती घेण्यासाठी आले होते. या प्रक्रियेदरम्यान संबंधित अधिकाऱ्यांना सर्व माहिती दिली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अरोरा आणि त्यांची संस्था ‘डिझाईन बॉक्स’ यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. या विषयावर कोणताही संभ्रम, अफवा पसरवू नये तसेच तथ्यांच्या आधारेच निष्कर्ष काढावा,’’ असे आवाहन त्यांनी ‘एक्स’वर केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.