Pimpri-Chinchwad BJP and NCP  Sarkarnama
पुणे

Pimpri-Chinchwad : ढाकेंना तोंड लपवावे लागणार; काटेंचा हल्लाबोल : भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : दुबई कनेक्शन असलेल्या गुन्हेगारांच्या कंपनीला स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत पिंपरी-चिंचवडमधील केबल इंटरनेट नेटवर्कचे काम देण्यावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या जोरदार कलगीतुरा सुरु आहे. या कंपनीला हे काम देण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत ही निविदा रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी केली होती.

त्याला या चोराच्या उलट्या बोंबा असल्याचे प्रत्युत्तर पालिकेतील माजी सत्ताधारी भाजपचे माजी पक्षनेते तथा सभागृहनेते नामदेव ढाके यांनी दिले. त्याचा समाचार आता राष्ट्रवादीचे पालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना ऊर्फ विठ्ठल काटे यांनी घेत ढाकेंशी संभावना अज्ञानी अशी केली.

पिंपरीचे केबल नेटवर्क गुन्हेगारांकडे देण्याचा भाजपचा बुरखा राष्ट्रवादीने फाडल्यानेच आता त्यांच्या नेत्यांची तंतरली आहे. आगामी पिंपरी महापालिका निवडणुकीत हे प्रकरण अंगलट येईल, हे दिसताच ढाके हे बाहुले पुढे करून 'मी नाही त्यातली…' असा आव त्यांनी आता आणला आहे. ढाकेंना तोंड लपवायची वेळ येणार आहे, असा हल्लाबोल काटेंनी काल केला.

राज्यात आघाडी सरकार असताना ही निविदा मंजूर केल्याचा ढाकेंचा दावा त्यांनी खोडून काढला. पिंपरी पालिकेत भाजपची सत्ता असताना हा विषय मंजूर झाला आणि राज्य सरकारनेही (शिंदे-फडणवीस) ५ जुलैला त्याला मान्यता दिली. याकडे त्यांनी लक्ष वेधले. यामुळे ढाकेंचे या प्रकरणातील अज्ञान दिसले. त्यांनी थोडा गृहपाठ केला असता तर बरे झाले असते, असा टोलाही त्यांनी लगावला.

ढाके यांचा बोलविता धनी वेगळाच असून ते निव्वळ बोलके बाहुले आहेत. भविष्यात त्यांची स्थिती `घर का ना घाटका` अशी होणार आहे, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली. जॅकवेल प्रकरणात तोंडघशी पडलेले भाजपचे पिंपरी पालिकेतील दुसरे माजी सभागृहनेते एकनाथ पवार यांच्यानंतर आता ढाकेंनाही या प्रकरणामुळे तोंड लपवायची पाळी येणार आहे, असे ते म्हणाले.

भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांनीच पालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटी कंपनीचे कार्याध्यक्ष शेखरसिंह यांच्याकडे हा विषय मंजुरीसाठी तगादा लावला होता, असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादीने ही निविदा रद्दची मागणी प्रथम केल्याने आता भाजपला उपरती सुचून त्यांनीही ती केली असल्याचे ते म्हणाले. तसेच राज्यात आता तुमचेच सरकार असल्याने हे काम रद्द करून दाखवा, असे आव्हानच त्यांनी ढाकेंना दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT