Baramati Dudh Sangh News  Sarkarnama
पुणे

Baramati Dudh Sangh: मोठ्या राजकीय उलथापालथीमध्येही अजित पवारांचे बारामतीवर लक्ष; दूध संघाच्या अध्यक्षपदी गावडेंची केली निवड

Baramati Dudh Sangh President: बारामती दूध संघाच्या अध्यक्षपदी पोपटराव गावडे, तर उपाध्यक्षपदी संतोष मारुती शिंदे यांना संधी देण्यात आलेली आहे.

कल्याण पाचांगणे

Baramati Dudh Sangh News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बंडानंतर अजित पवार यांचे बारामतीवर लक्ष असल्याचे दिसून येत आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली घडत असतानाही अजित पवार यांनी बारामती दूध संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी नावे सुचवित त्यांची बिनविरोध निवड केली आहे. बारामती तालुका सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी पोपटराव सोमनाथ गावडे (रा. कऱ्हावागज) यांची, तर उपाध्यक्षपदी संतोष मारुती शिंदे (रा. मुर्टी) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांना एक वर्षाचा कार्यकाळ ठरवून देण्यात आलेला आहे. (Poptrao Gawde as president of Baramati Dudh Sangh)

बारामती (Baramati) दूध संघाच्या (Dudh Sangh) संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक २ जून रोजी बिनविरोध पार पडली होती. त्या बिनविरोध निवडणूक प्रक्रियेत दूध संघाचे सर्वेसर्वा व नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भूमिका अनेक वर्षांच्या परंपरेनुसार निर्णायक ठरली होती. त्याचपद्धतीने अजित पवारांच्या सूचनेनुसार आज (सोमवारी, ता. ३ जुलै) अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडही बिनविरोध पार पडली.

निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर खंबायत यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी अजित पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदासाठी पोपटराव गावडे, तर उपाध्यक्षपदासाठी संतोष शिंदे यांनी नावे जाहीर केली. त्यानुसार उपस्थित नवनिर्वाचित संचालक मंडळाने त्यांना बिनविरोध काम करण्याची संधी दिली.

बारामती दूध संघाचा सर्वांगीण झालेला विस्तारवाढ विचारात घेता अजित पवार हे अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी कोणाची नावे सुचवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मावळते अध्यक्ष व नवनिर्वाचित संचालक संदीप हनुमंतराव जगताप (कुरणेवाडी) यांनी या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांनी आपल्या कारर्किर्दीमध्ये अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली ८० कोटी रुपये किंमतीचा दूध पावडर प्रकल्प नव्याने उभारण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्याचे सांगितले.

नवनिर्वाचित संचालक संजय शेळके (काटेवाडी), प्रशांत खलाटे (लाटे), श्रीपती जाधव (डोर्लेवाडी), दत्तात्रेय वावगे (सोनवडी सुपे) , शहाजी गावडे (मळद), संजय कोकरे (पणदरे) , सतिश पिसाळ (फोंडवाडा), बापुराव गवळी (उंडवडी सुपे), नितीन जगताप (वाकी), किशोर फडतरे (सिद्धेश्वर निंबोडी), संजय देवकाते (नीरावागज), सुशांत जगताप, स्वाती खामगळ (ढाकाळे), शोभा जगताप (वडगाव निंबाळक) , राजेंद्र रायकर (काऱ्हाटी), पुरूषोत्तम गाढवे (आंबी खुर्द), मुख्य व्यवस्थापक सचिन ढोपे आदी या वेळी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT