शिरूर : अनेक दिवसांपासून विविध कारणांनी आमदार ॲड. अशोक पवार (Ashok Pawar) व शिरूर नगर परिषदेचे सभागृह नेते प्रकाश धारिवाल (Prakash Dhariwal) यांच्या समर्थकांत निर्माण झालेल्या कथित 'लॉबी' गीरी मुळे भडकू पाहणा-या शितयुद्धावर आज (ता.२६) अखेर पडदा पडला. त्याला कारण ठरले ते आमदारांच्या नागरी सत्कार समारंभात दोघांनी एकमेकांवर उधळलेल्या स्तुतीसुमनांचे. कार्यक्रमात धारिवाल यांच्या समर्थकांनी 'तुम्ही आमदार व्हावे', अशी इच्छा प्रदर्शित करताच स्वतः धारिवाल यांनी माईकचा ताबा घेत 'अशोक पवार आमदार म्हणजे मीच आमदार आहे', असे सांगितले. तसेत मी शहरापूरतेच राजकारण करणार असल्याचे व नगर परिषदेच्या आगामी निवडणूकीत ताकदीनिशी पॅनेल टाकणार असल्याचे जाहीर केले.
आमदार पवार यांची पुणे जिल्हा बॅंकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा आज धारिवाल यांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. नगराध्यक्षा वैशाली वाखारे, शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे पाटील, माजी नगराध्यक्ष रवींद्र ढोबळे, शिरूर खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, संचालक सुरेश पाचर्णे, शिरूरचे सरपंच नामदेव जाधव, उपसरपंच नितीन बो-हाडे आदी यावेळी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून पवार आणि धारिवाल यांच्यात काहीसा बेबनाव निर्माण झाल्याचे चित्र होते. त्यांच्या समर्थकांच्या लॉबीतही अहमहमिका चालू होती. काही आमदार समर्थक कार्यकर्ते हे नगर परिषद निवडणुकीसाठी सरसावले असताना, काही धारिवाल समर्थक कार्यकर्त्यांच्या अस्तित्वाला धक्का पोहचू पाहात होता. त्यातून कुरबूरी वाढून शितयुद्ध रंगले होते. चार महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत नगर परिषदेच्या नवीन इमारतीचे उदघाटन झाल्यानंतर दीर्घकाळ हे नेते एका व्यासपीठावर आले नव्हते. तसा तो कार्यक्रमच या दोघांतील दूराव्यात कळीचा मुद्दा ठरला होता. एकमेकांना डावलले गेल्याच्या तक्रारी करीत आमदार व धारिवाल समर्थकांचे 'व्हॉटस अप वॉर' ही रंगले होते. त्यातच आमदारांना इशारेवजा धमकीचे निनावी पत्र शहरातील काहींना आल्यानंतर हे युद्ध आणखी भडकले होते.
त्यातून एकमेकांकडे संशयाने पाहिले गेले. कालांतराने धमकी पत्राचा विषय मागे पडला या दोघांना एकत्र आणण्याची संधी अनेकजण शोधत होते. त्यातच आमदारांची जिल्हा बॅंकेवर निवड झाली; तर धारिवाल यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला. हीच संधी साधून आजच्या कार्यक्रमात दोघांना एका व्यासपीठावर आणण्यात आले. या कार्यक्रमात दोघांनीही एकमेकांवर स्तुतीसुमने उधळल्याने त्यांच्यात बेबनावाचा प्रयत्न करणारांचे चेहरे मात्र, काळवंडले.
प्रकाश धारीवाल यांच्या सारखी माणसे विरळ असून त्यांचे नेतृत्व या नगरीला लाभले हे तुमचे-आमचे भाग्य आहे. यापुढे नगरीच्या विकासासाठी, प्रगतीसाठी त्यांचेच नेतृत्व पाहिजे, असे स्पष्ट करीत आमदार पवार यांनी त्यांच्या शिरूर शहरातील नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. तर शिवसेवा मंडळ ट्रस्टचे चिटणीस, धारिवाल समर्थक मनसुखलाल गुगळे यांनी 'अशोकबापू आता प्रकाशशेठ ला देखील आमदार करा', अशी मागणी केली. त्यावेळी स्वतः धारिवाल यांनी माईक हातात घेत, 'पवार व धारिवाल या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, पवार आमदार म्हणजे मी आमदार', अशा स्पष्ट शब्दांत भविष्यातील राजकीय वाटचालीत आमदारांशी कुठलीही स्पर्धा नसल्याचे जाहिर केले.
आमदारांशी आमचे घरगुती संबंध असून, आमच्यात कुठलेही गैरसमज नाही. माजी आमदार रावसाहेबदादा पवार व माझे वडील रसिकलाल धारिवाल यांच्यात सलोख्याचे संबंध होते. माझ्यात आणि अशोक पवार यांच्यात योग्य राजकीय ताळमेळ आहे. तर माझा मुलगा आदित्य आणि अशोकबापूंचा मुलगा ऋषिराज हे देखील एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे या तीन पिढ्यांच्या संबंधांत किरकोळ बाबींमुळे कुठलीही कटूता येणार नसल्याचे धारिवाल यांनी स्पष्ट केले. शिरूर शहराच्या विकासासाठी आम्हाला आमदारांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभत असून, नियोजनबद्ध विकास करणारे नेते म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. मंत्रालयातील आमच्या सर्व कामांचा ते योग्य पाठपुरावा करतात. नगरीच्या विकासासाठी त्यांनी कोट्यवधी रूपये राज्य सरकारकडून मिळवून दिले आहेत.
दुरदृष्टीचे नेतृत्व असल्यानेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना जिल्हा बॅंकेवरही काम करण्याची संधी दिली, अशा शब्दांत धारिवाल यांनी आमदार पवार यांच्या कामाचा व व्यक्तिमत्वाचा गौरव केला. आमच्यात कुठलेही अंतर्गत राजकाण नाही की कुठलीही फाटाफूट झालेली नाही. भांडण नाही वा गैरसमज नाहीत. राजकारणात पुड्या पसरविण्याचे काम चालते. मात्र, कृपा करून ते इथे कुणी करू नये. आम्ही नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत एकत्र काम करणार आहोत, असेही त्यांनी जाहीर केले. अशोक पवारांचा विकासात्मक दृष्टीकोन चांगला असल्याने पुढेही ते आमदार राहतील, इतकेच नव्हे तर मंत्रीही होतील, अशा आशावाद धारिवाल यांनी व्यक्त केला. तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.
धारिवाल यांच्यासारखे मोठे उद्योजक शहराचे नेतृत्व करतात ही आमच्या दृष्टीने समाधानाची बाब आहे. त्यांच्याच नेतृत्वाखाली नगरीच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन आमदार पवार यांनी यावेळी दिले. आमच्यातील संबंधाला, नात्याला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. रसिकभाऊंनी या नगरीच्या विकासाचा पाया घातला तर त्यावर कळस चढविण्याचे काम प्रकाश धारिवाल यांनी केले. निरपेक्ष वृत्तीने ते या नगरीची सेवा करीत असल्याने विकासाची परंपरा पुढे चालवताना त्यांनीच या नगरीचे नेतृत्व करावे अशी माझ्यासह सामान्य जनतेची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष नामदेवराव घावटे, कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष ॲड. किरण आंबेकर यांनी मनोगते व्यक्त केले. आजच्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने आमदार पवार व सभागृह नेते धारिवाल यांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी युवा नेते किरण पठारे पाटील, सचिन कातोरे, संतोष भंडारी, मुजफ्फर कुरेशी, ॲड. प्रदीप बारवकर, अमोल चव्हाण, नीलेश पवार आदींनी पुढाकार घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.