Pune Atal Bihari Vajpayee Medical College. Sarkarnama
पुणे

Pune Medical College News: पुण्याच्या मेडिकल कॉलेजमधील ‘ती’ वसुली म्हणजे राजकीय नेत्यांचे रॅकेट ? नावे उघड होणार !

सरकारनामा ब्यूरो

Pune News : पुणे येथील माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये बव्हंशी विद्यार्थ्यांकडून मोठी रक्कम उकळण्याच्या आल्याच्या तक्रारी आहेत. यामध्ये अधिकाऱ्यांचा हात असल्याचे सांगण्यात येत असले तरी राजकारण्यांच्या दबावाशिवाय हे शक्य नसल्याचीही चर्चा आहे.

प्रवेश प्रक्रियेमधील कोट्यवधी रुपयांच्या प्रकरणाचे बिंग फुटण्याची शक्यता आहे. या वसुली प्रकरणात अधिकाऱ्यांमागे कोणी राजकारणी आहेत का, त्यांच्या दबावातूनच विद्यार्थ्यांना लुटले गेले का, या बाबींचा छडा लागणार असून, त्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्याचे समजते.

राजकारण्यांच्या सांगण्याशिवाय अधिकारी एवढ्या मोठ्या प्रमाणात जोखीम घेऊ शकणार नसल्याचेही बोलले जात आहे. या घटनेत 'अॅण्टि करप्शन' ने ताब्यात घेतलेले डॉ. आशिष बनगिनवार यांच्या अटकेने महापालिकेच्या राजकारणातील काही नेत्यांची झोप उडाल्याचीही चर्चा आहे. ही वसुली कोणाच्या आशीर्वादाने झाली, हेही आता लवकरच उघड होणार आहे.

पुणेकरांसाठी आरोग्य व्यवस्था व्यापक व्हावी, यासाठी मोठा गाजावाजा करून तीन वर्षांपासून हे कॉलेज सुरू करण्यात आले. या कॉलेजच्या बांधकामासह प्रत्यक्ष वर्ग भरविण्यासाठी महापालिकेकडून ६५० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्यात येत आहे. कॉलेजमधील दोन टप्प्यांत विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत.

पहिल्या टप्प्यासाठी सात लाख आणि संस्थात्मक कोट्यातील प्रवेशासाठी २२ लाख ५० हजार रुपये प्रवेशशुल्क निश्चित केले आहेत. तरीही, बहुतांशी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी २० लाख रुपये घेतल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत सविस्तर वृत्त ‘सरकारनामा’ ने मांडले होते. त्यामुळे पुणे महापालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

आता पोलिसांनी (Police) या प्रकरणाच्या खोलात जाऊन चौकशी सुरू केली आहे. या वसुली प्रकरणात आणखी कोणाचा समावेश आहे, याचा शोध घेण्यात येत आहे. त्यासाठी 'अॅण्टि करप्शन'ने कॉलेजची झाडाझडती घेतल्याचे समजते. या कॉलेजच्या व्यवस्थापनासाठी राजकारणी, अधिकाऱ्यांची ट्रस्ट आहे. त्यात आता महापालिकेत (Municipal Corporation) प्रशासकीय राजवट असल्याने ट्रस्टचा कारभार अधिकाऱ्यांकडून चालविला जातो.

काही राजकारणी (Political Leaders) आजही कॉलेजच्या कारभारात ढवळाढवळ करत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्याचवेळी अधिकारीही स्वतःच्या सोयीने निर्णय घेत असल्याचेही स्पष्ट आहे. या सगळ्या प्रकरणातून कॉलेजमधील अधिकारी-कर्मचारी प्रवेश प्रक्रियेतून 'कमाई' करीत असल्याचे स्पष्ट आहे. परंतु, त्यासाठी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना राजकारण्यांकडून बळ दिले गेले असल्याचीही शक्यता आहे. एकूणच काय, कॉलेज सुरू होऊन आता दोन-तीन वर्षे झाली नाहीत, त्यातही अशा प्रकारे प्रवेशातून पैसे लुबाडले जात असल्याने पुणेकर अवाक झाले आहेत.

Edited By : Atul Mehere

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT