Pune News : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गैरव्यवहार प्रकरणी नेमलेले चौकशी अधिकारी सलगपणे हात वर करत आहेत. नव्याने नेमलेले विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांनीही चौकशीस नकार दिल्याने प्रकरण पुन्हा थंडबस्त्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापूर्वी प्रकाश जगताप, दिगंबर हौसारे आणि मोहन निंबाळकर या अधिकार्यांनी चौकशीमधून माघार घेतली होती. आता चौथा अधिकारीही पाय मागे घेतल्याने या चौकशीला सुरूवातच होईल की नाही, असा सवाल बाजार घटकांकडून केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह यांनी मुख्यमंत्र्यांसह पणनमंत्री आणि पणन खात्याला या प्रकरणी सहनिबंधक दर्जाच्या त्रयस्त अधिकार्यांकडून चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतरच सुर्वे यांची नेमणूक करण्यात आली होती. मात्र, त्यांनी पणन संचालकांना पत्र देत ५१ मुद्द्यांची चौकशी तीन महिन्यांत पूर्ण करणे शक्य नाही.
विभागीय जबाबदार्या प्रचंड असल्याने वेळ देणे शक्य नाही. माझ्या ऐवजी दुसर्या अधिकार्याची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. यामुळे चौकशी अधिकार्यांच्या बदल्यांची मालिका सुरू राहणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बाजार समितीतील (Bazar Samiti) विविध घोटाळ्यांवर चौकशीच्या हालचाली वारंवार ठप्प होत असल्याने शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये संताप व्यक्त होत आहे.
बाजार समितीच्या संचालक मंडळावर टेंडर घोटाळा, स्वच्छतागृह खर्चातील अपहार, पार्किंग ठेका, रिकाम्या जागांची भाडेवसुली, बनावट पावती पुस्तक, सेस चोरी, बनावट पावत्यांद्वारे भरणा, सुरक्षारक्षक ठेका अशा अनेक गैरव्यवहारांचे आरोप आहेत.
या सर्व तक्रारींवर राष्ट्रवादीचे शरद पवार, आमदार रोहित पवार, प्रवक्ते विकास लवांडे यांनी पणनमंत्री आणि संचालकांकडे लेखी तक्रार केली होती. याशिवाय नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनीही संचालक मंडळ बरखास्तीची मागणी मुख्यमंत्र्याकडे केली होती.
याबाबत माहिती देताना ‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकशीसाठी सहनिबंधक योगीराज सुर्वे यांची नियुक्ती केली होती. मात्र त्यांनी कामाच्या व्यापासह अन्य कारणे दिली आहेत. त्यामुळे याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.’ असं पणन संचालक विकास रसाळ यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे म्हणाले,पुणे बाजार समितीच्या गैरकारभाराच्या चौकशीबाबत पणन संचालक कार्यालय जाणीवपूर्वक विलंब लावत आहे. या भ्रष्ट कारभाराला अप्रत्यक्ष पाठीशी घातली जात असल्याचे आमच्या अनुभवावरून स्पष्ट होते. चौकशी लांबवली जात असल्याने शेतकरी आणि बाजार घटकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे आम्ही लवकरच पणन संचालक कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.