Pune minor assault case : पुण्यातील नसरापूर (ता. भोर) गावातील चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत, तिची निर्दयी हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या घटनेचे संतापजनक पडसाद उमटत आहे.
या गुन्ह्यातील 65 वर्षीय विकृत व्यक्तीवर कठोरातील कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी, या घटनेवरून राज्यातील महिलांसाठी हा काळ काळरात्र ठरत आहे, असा घणाघात केला आहे.
भोर तालुक्यातील नसरापूर गावातील चार वर्षांच्या चिमुरडीवर 65 वर्षीय विकृत व्यक्तीने अत्याचार करून तिची निर्दयी हत्येच्या प्रकारानं खळबळ उडाली आहे. या अमानुष घटनेमुळे गावासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात (Maharashtra) नेमकं काय चाललं आहे, असा प्रश्न करत आहे.
काँग्रेस नेते आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी, यावर 'एक्स'वर पोस्ट करत आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली. 'नसरापूरची घटना म्हणजे माणुसकीचा पराभव आहे! असे म्हणत, राज्यात चार वर्षांची चिमुरडीही सुरक्षित नसेल, तर तुमच्या उत्कृष्ट कायदा-सुव्यवस्थेच्या गप्पा कशासाठी? गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरलेला नाही हेच सत्य आहे,' असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
माता-भगिनी, लेकी बाळींसाठी प्रत्येक जागा असुरक्षित आणि प्रत्येक क्षण दहशतीचा झाला. नसरापूरमधील त्या चिमुकलीचा आक्रोश गृहमंत्रालयापर्यंत पोहोचतोय का? तुमची यंत्रणा फक्त कागदावर भक्कम आहे का? राज्यातील महिलांसाठी हा काळ काळरात्र ठरत आहे, असा गंभीर सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला.
कोणतीही घटना झाली की, गृहमंत्री एकतर क्लिनचीट देतात, नाही तर कठोर कारवाई करू, अशा बाता मारतात! कठोर कारवाई केली असती, तर आज या चिमुकलीचा बळीच गेला नसता! महाविकास आघाडीने यासाठीच शक्ती कायदा आणला होता. पण या सरकारला तेही बघवत नाही. शक्ती कायदा आता तरी आणा, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
गृहमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारावी या प्रकरणाची, हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर चालवावे आणि आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे! या दुर्दैवी घटनेबाबत स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत असलेला संताप अत्यंत रास्त आहे, असेही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
सरकारने नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नये, न्यायासाठी आंदोलन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू नये. या दुर्दैवी घटनेतील नराधमाला कडक शासन करावे व राज्यातील महिलांना अशा नराधमांपासून अभय द्यावे. अन्यथा जनतेचा हा उद्रेक आपली खुर्ची उलथवून टाकल्याशिवाय थांबणार नाही! असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.