PMC elections News : पुणे महापालिका निवडणुकीतील उमेदवार निश्चित केले जात असताना भाजपमध्ये स्थानिक आमदारांना विश्वासात न घेता काही पक्षप्रवेश करून घेण्यात आल्याने प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत वादावादी झाल्याचे प्रकार घडले आहेत. त्यानंतर भाजपच्या कोअर कमिटीने प्रत्येक आमदारांसोबत अर्धा ते एक तास स्वतंत्रपणे चर्चा करून प्रभागातील उमेदवारांबाबत मते जाणून घेतली. त्यांची नाराजी दूर करतानाच प्रत्येक प्रभागातील आमदारांची पसंती कोणत्या उमेदवाराला आहे, हे जाणून घेण्यात आले.
या बैठकीत संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली असली तरी यावर उमेदवारांची नावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच अंतिम करणार आहेत. यासाठी गुरुवारी मुंबईत बैठक होणार आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आपटे रस्त्यावरील एका तारांकित हॉटेलमध्ये रात्री उशिरापर्यंत बैठक सुरू होती. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर आदी उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, त्यामुळे भाजपने उमेदवार यादी अंतिम करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंत खडकवासला, वडगाव शेरी, कसबा, कोथरूड, हडपसर या मतदारसंघातील प्रभागांसाठी बाहेरच्या पक्षातील पदाधिकारी, माजी नगरसेवकांना पक्षात घेतले आहे. या प्रवेशावरून शहरातील आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रवेश झालेले माजी नगसेवक वरचढ ठरणार असल्याने पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
शहरात आठ पैकी भाजपचे सहा आमदार आहेत. या प्रत्येक मतदारसंघातील कोणत्या प्रभागात कोण उमेदवार असला पाहिजे हे समजून घेण्यासाठी स्थानिक आमदारांकडून प्रत्येक प्रभागातून चार नावे मागविण्यात आली. ज्या नावांवर एकमत आहे अशा नावांची स्वतंत्र यादी तयार केली जाणार असून, प्रदेशच्या बैठकीत त्यास मान्यता घेऊन उमेदवारांची नावे जाहीर केली जाणार आहेत.
आमदारांच्या यादीत असलेले नाव पक्षाने केलेल्या सर्वेक्षणात मागे पडल्याचे समोर आल्यास तेथे कोअर कमिटीच्या शिफारशीद्वारे उमेदवारी निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारी यादी जाहीर होईपर्यंत सस्पेन्स कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच ज्या प्रभागात उमेदवारी कोणाला द्यावी यावरून मतभेद आहेत, याचा निर्णय राज्यातील प्रमुख नेते घेणार आहेत.
भाजपचे (BJP) शहरात 99 नगरसेवक होते. त्यातील जवळपास 40 ते 45 नगरसेवकांची उमेदवारी धोक्यात आहे. त्यामुळे कसबा, कोथरूड, खडकवासला या मतदारसंघात नवे चेहरे मिळण्याची शक्यता आहे, असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून खासगीत सांगितले जात आहे.
पुणे आणि पिंपरीतील विधानसभानिहाय जागांची चर्चा झाली. शिवसेना, ‘रिपाइं’ला किती जागा द्यायच्या यावर चर्चा केली. आमदारांची मते जाणून घेतली आहेत. दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल.
- मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.