Pune News, 06 May : पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची प्रचंड बहुमताने सत्ता आल्यानंतर पक्षातील अंतर्गत वाद सातत्याने समोर येत असल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या आजी-माजी नगरसेविकांमध्ये पुणे महापालिकेच्या आवारातच वाद रंगाल्याचे पाहायला मिळालं.
त्यानंतर आता अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे या दोन नगरसेविकांमधील संघर्षा पेटल्याचं पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्यावर खडक पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजेच ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, ही तक्रार भाजपच्याच दुसऱ्या नगरसेविका मृणाल कांबळे यांचे वडील पांडुरंग उर्फ बापू कांबळे यांनी दिली आहे. एकाच पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांमधील हा वाद पोलीस ठाण्यात गेल्याने भाजपच्या स्थानिक नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे.
महापालिका निवडणुकीपासूनच पाटील आणि कांबळे कुटुंबांमध्ये राजकीय 'कलगीतुरा' सुरू होता. प्रचारा दरम्यान पाटील दांपत्याने जातीय द्वेषातून निवडणूक कार्यालयावरील बॅनर काढणे, कांबळे यांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करणे, तसेच विजयानंतर त्यांच्या घरासमोर लावलेल्या बॅनरवरूनही वाद निर्माण केल्याचा आरोप मृणाल कांबळे यांच्या वडिलांनी तक्रारीत नमूद केले आहे.
तसेच, पाटील हे जाणीवपूर्वक एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करत असल्याचा गंभीर आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. नगरसेविका मृणाल कांबळे यांचे फोटो झाकणे, अनुसूचित जातीतील कार्यकर्त्यांना धमकावणे आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न पाटील यांनी केल्याचा उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे.
या सर्व आरोपांच्या आधारे नगरसेविका अर्चना पाटील आणि त्यांचे पती तुषार पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हा वाद केवळ एका बाजूने नाही. काही दिवसांपूर्वीच नगरसेविका अर्चना पाटील यांनीही आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन आपल्या विरोधात कट केला रचला जात असून आपले मॉर्फ केलेले व्हिडिओ प्रसारित केले जात असल्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर, या वादाची रीतसर तक्रार त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही केल्याचे सांगितले जात आहे.
पुण्यातील भाजपचे बडे नेते या दोन्ही नगरसेविकांमधील वाद मिटवण्यासाठी आणि समन्वय साधण्यासाठी पडद्यामागून प्रयत्न करत होते. मात्र, आता थेट ॲट्रॉसिटीसारखा गंभीर गुन्हा दाखल झाल्याने हा वाद मिटण्याऐवजी अधिकच चिघळण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.