Pune News, 17 News : महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता असतानाही नगरसेवकांची कामे होत नसल्याचा संताप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या बैठकीत काही दिवसांपूर्वीच बाहेर आला होता. प्रशासनावर अंकुश ठेवण्यापासून ते पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीपर्यंत नगरसेवकांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. या बैठकीनंतर भाजपमध्ये समन्वयाचा संदेश दिला जात असतानाच आता महापालिकेतच पदाधिकाऱ्यांमधील कथित ‘शीतयुद्धा’ची चर्चा सुरू झाली आहे.
सभागृह नेते गणेश बिडकर यांनी मंगळवारी थेट महापालिका आयुक्त, तिन्ही अतिरिक्त आयुक्त आणि विविध विभागप्रमुखांची बैठक घेतली. शहरातील महत्त्वाचे प्रकल्प, विकासकामे आणि रखडलेल्या निर्णयांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
मात्र, या बैठकीला महापौर मंजूषा नागपुरे आणि स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनाच निमंत्रण नसल्याची चर्चा समोर आली आहे. त्यामुळे भाजपच्या सत्ताकारणात नेमके चालले तरी काय, असा सवाल महापालिका वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
मोहोळांनी कानमंत्र दिला अन्...
काही दिवसांपूर्वी खासदार मुरलीधर मोहोळ यांनी भाजप नगरसेवकांची बैठक घेतली होती. या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाच्या कारभाराचा अक्षरशः पंचनामा केला होता. कचरा, खड्डे, रस्ते, समाविष्ट गावांतील कर आकारणी, निधी, प्रभाग समित्यांचे कामकाज आणि अधिकाऱ्यांची मनमानी या मुद्द्यांवर नगरसेवकांचा संताप बाहेर आला होता.
‘आपण प्रशासनाला प्रोटेक्ट करायला बसलो आहोत का?’ असा थेट सवालही करण्यात आला होता. काही नगरसेवकांनी तर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कामकाजावरही नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती.
मोहोळांच्या या बैठकीनंतर पक्षांतर्गत समन्वयाने काम करण्याचा संदेश दिला जात असतानाच काही दिवसांतच बिडकरांनी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या अनुपस्थितीत अधिकाऱ्यांची बैठक घेतल्याने या बैठकीला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
आयुक्तांसह अधिकाऱ्यांची ‘बैठक?
आयुक्त नवल किशोर राम यांच्यासह तिन्ही अतिरिक्त आयुक्त आणि सर्व विभागप्रमुख या बैठकीला उपस्थित होते. नदीकाठ सुधार प्रकल्पासह दोन-तीन महत्त्वाच्या प्रकल्पांमधील अडथळे, प्रलंबित निर्णय आणि आगामी विकासकामांबाबत चर्चा झाल्याचे समजते. शहराच्या विकासाशी संबंधित एवढ्या महत्त्वाच्या बैठकीत महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष नसल्याने ‘सत्तेतील समन्वय नेमका कुठे आहे?’ हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
भिमालेंचा ‘मला माहिती नाही’चा बॉम्ब
या बैठकीबाबत स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे, माझी तब्येत थोडी खराब होती आणि ‘मला याबाबत कोणतीही माहिती नाही,’ अशी स्पष्ट प्रतिक्रिया त्यांनी दिली. भिमाले यांच्या या प्रतिक्रियेमुळे चर्चेला आणखी उधाण आले आहे.
सभागृह नेते अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाच्या विकासकामांचा आढावा घेत असतील, तर स्थायी समितीच्या अध्यक्षांना त्याची माहिती का नाही? महापौरांना बैठकीपासून दूर ठेवण्याचे कारण काय? बैठकीत नेमके कोणते निर्णय झाले? असे प्रश्न आता भाजपच्या गोटातच उपस्थित होऊ लागले आहेत.
नगरसेवक नाराज, पदाधिकारी वेगळ्या दिशेने?
एकीकडे भाजपचे नगरसेवक प्रशासनाच्या मनमानीविरोधात आवाज उठवत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांमध्येच महत्त्वाच्या बैठकीबाबत समन्वय नसल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे ‘मोहोळांच्या बैठकीनंतर भाजपमधील धुसफूस मिटली की आणखी वाढली?’ अशी चर्चा आता महापालिका वर्तुळात रंगली आहे.
महापालिकेत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय राहिला नाही, तर त्याचा थेट परिणाम विकासकामांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, महापौर मंजूषा नागपुरे यांची भूमिका जाणून घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.