Shrinath Bhimale Sarkarnama
पुणे

Pune BJP Shrinath Bhimale : 'महामंडळ नको, विधिमंडळ द्या' ; दादांच्या नेत्यापाठोपाठ भाजपच्याही नेत्याचा सूर!

BJP Leader's Stance on Legislative Assembly: बंडखोरी टाळण्याच्या दृष्टिकोनातून इच्छुकांना महामंडळ देऊन शांत करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांकडून सुरू आहे.

Sudesh Mitkar

Pune Vidhan sabha Election News : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी काही तास आधी राज्य सरकारने विविध महामंडळांवर नेत्यांची नियुक्ती केली आहे. आगामी निवडणुकीमध्ये संभाव्य बंडखोरी टाळण्याच्या दृष्टिकोनातून इच्छुकांना महामंडळ देऊन शांत करण्याचा प्रयत्न राज्यकर्त्यांनी केला असला, तरी आता ही नेते मंडळी 'आम्हाला महामंडळ नको, विधिमंडळ द्या' अशी मागणी करत आहेत. त्यामुळे महायुतीची डोकेदुखी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पुणे शहरातील तीन नेत्यांची महामंडळावर वर्णी लागल्याचे समोर आले आहे. यामध्ये माजी आमदार आणि मंत्री दिलीप कांबळे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष करण्यात आला आहे. तर राज्य वखार महामंडळावर राजेश पांडे यांची वर्णी लागली आहे. याशिवाय श्रीनाथ भिमाले यांना राज्य कंत्राटी सल्लागार महामंडळाचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे.

भाजपचे महापालिकेतील वरिष्ठ नेते असलेले श्रीनाथ भिमाले हे पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. या ठिकाणी विद्यमान आमदार माधुरी मिसाळ या तीन टर्म विजयी झालेल्या आहेत. तर चौथ्या वेळेस देखील त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्रीनाथ भिमाले हे नाराज होण्याची शक्यता असल्याने त्यांना महामंडळ देऊन शांत करण्याचा प्रयत्न पक्षाकडून करण्यात आला असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मात्र श्रीनाथ भिमाले यांनी 'मी महामंडळ मागितलं नाही, तर विधिमंडळ मागितलं असून मला माझ्या पक्षाकडून विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळेल.' असा ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

श्रीनाथ भिमाले, म्हणाले महामंडळाच्या नियुक्ती बाबत मला माध्यमांमधून कळलं आहे.अद्याप कोणत्याही नेत्यांनी अथवा प्राशासकीय अधिकाऱ्यांनी मला याबाबत कळवलेलं नाही. मला कोणते पत्र देखील प्राप्त झालेले नाही. मी विधानसभा निवडणूक लढण्यावर ठाम असून उद्या माझी उमेदवारी निश्चित होईल. असा मला विश्वास आहे. उद्या भाजपची पहिली उमेदवार यादी येणार असून त्या यादीमध्ये माझं नाव असेल असा मला ठाम विश्वास असल्याचं श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार(Ajit Pawar) गटाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू साहेब भेगडे यांनी देखील. 'आपल्याला महामंडळ नको मावळमधून विधानसभेची उमेदवारी द्या.' अशी मागणी केली आहे. या भूमिकेमुळे त्या ठिकाणी असलेल्या अजित पवार गटाचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचं टेन्शन वाढलं आहे.

बंडोबांना थंड करण्यासाठी महामंडळाचा डाव महायुतीच्या सरकारने टाकला असला तरी इच्छुक असलेले नेते आपली महामंडळावर बोळवण होत असल्याचं बोलून दाखवत आहेत. त्यामुळे अद्याप तरी युती सरकार मधील पक्षांची टाकलेली ही चाल उलटी पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT