पुणे

Pune BJP NCP controversy : पुण्यात भाजप-राष्ट्रवादीत निधीनाट्याचा भडका : गणेश बिडकर यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र

Pune politics fund allocation controversy : पुण्यात निधीवाटपाच्या मुद्द्यावरून भाजप-राष्ट्रवादीत वादाची ठिणगी; गणेश बिडकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिले.

सरकारनामा ब्यूरो

पुणे महापालिकेत सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस आता चव्हाट्यावर आली असून, भाजपचे सभागृहनेते गणेश बिडकर यांनी अमोल बालवडकर यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडेच तक्रार केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना निधी दिला आहे, महापालिकेच्या सभागृहात भाजपपेक्षा जास्त त्यांना बोलण्याची संधी मिळाली आहे.

असे असतानाही बालवडकर यांच्याकडून भाजपच्या नेत्यांवर, सरकारच्या उपक्रमावर कायम चिखलफेक होत आहे. बालवडकरांचे वर्तन अहंकारी, हेकेखोर आहे. त्यामुळे बालवडकर आणि सुहास टिंगरे यांचा निधी काढून घेतला आहे, असे बिडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनाही बिडकर यांनी हे पत्र पाठवले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार करण्याचा बिडकरांना नैतिक अधिकार नसल्याचे प्रत्युत्तर अमोल बालवडकर यांनी दिले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी तिरंगा रॅली काढली गेली. यात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह भाजपचे अन्य नेते सहभागी झाले होते. त्यावरून बालवडकर यांनी जाहीरपणे आमच्या नेत्यांसह महापौर मंजूषा नागपुरे यांच्‍यावरही टीका केली.

तसेच चंद्रकांत पाटील यांच्या मतदारसंघातील विकासकामांची चौकशी करण्याचा प्रस्ताव बालवडकर आणि सुहास टिंगरे यांनी देऊन टीका केली. हे भाजपच्या कार्यकर्त्यांना पटणारे नाही. त्यामुळे या दोघांच्याही विकास निधीचे वर्गीकरण केले आहे. बालवडकर यांची महापालिकेच्या सभागृहातील भूमिका अहंकारी, असंसदीय व हेकेखोरपणाची, कामकाजात बाधा आणणारी होती. ही वस्तुस्थिती आपल्या निदर्शनास आणून देत आहोत, असे बिडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दुप्पट वेळ

भाजपकडून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सभागृहात बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरही बिडकर यांनी पत्रातून उत्तर दिले आहे. फेब्रुवारी ते जुलै २०२६ या कालावधीत भाजपच्या १२६ सदस्यांना एकूण १ हजार १६० मिनिटे, तर राष्ट्रवादीच्या २७ सदस्यांना ५०६ मिनिटे बोलण्यासाठी संधी मिळाली आहे. यानुसार भाजपच्या प्रत्येक नगरसेवकाला सरासरी ९ मिनिटे, तर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना सरासरी १८ मिनिटे बोलण्यासाठी वेळ मिळाला आहे. त्यामुळे ही तक्रारही वस्तुस्थितीला धरून नाही, असे बिडकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

बिडकरांचे आरोप बिनबुडाचे : बालवडकर

बिडकर यांच्या पत्राला बालवडकर यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. महापालिकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धमकावण्याचा प्रयत्न केला, ‘आपली युती फक्त राज्यात आहे, पुण्यात नाही’ असे वक्तव्य करणाऱ्या बिडकरांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र लिहिण्याचा नैतिक अधिकार नाही. पत्रातील माझ्यावरील आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. माझा निधी शून्य करून मला शांत करता येईल, असे भाजप नेत्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. पुणेकरांच्या हक्कांसाठी माझा आवाज आणखी तीव्र होईल. अजित पवार यांनी अर्थमंत्री असताना भाजपसोबत कधीच सुडाचे राजकारण केले नाही; मग भाजप आमच्याशी असे राजकारण का करत आहे? असा प्रश्‍न बालवडकर यांनी उपस्थित केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT