

Eknath Khadse Amrit Mahotsav : जळगावचे ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. खडसेंनी आपला यंदाचा वाढदिवस मोठ्या दणक्यात साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या ३० ऑगस्ट रोजी मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताबाई मंदिरात हा भव्य सोहळा पार पडणार आहे.
या अमृतमहोत्सवी सोहळ्यासाठी एकनाथ खडसेंनी सर्वपक्षीय नेत्यांना कार्यक्रमाला बोलावण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका समोर आली आहे. खडसेंनी पत्रिकेतून सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केलं आहे. या निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती दर्शविण्यात आली आहे. दोघांचेही फोटो निमंत्रण पत्रिकेवर आहेत. तसेच या निमंत्रण पत्रिकेत खडसेंच्या कट्टर विरोधकांचे देखील फोटो आहेत. त्यामुळे खडसे आपल्या राजकीय विरोधकांकडे मैत्रीचा हात का पुढे करताय? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थितीत झाला असून जळगावच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे.
विशेष म्हणजे, खडसेंचे कट्टर राजकीय विरोधक मानले जाणारे मंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री सुरेश जैन, आमदार चंद्रकांत पाटील यांची छायाचित्रे निमंत्रण पत्रिकेत झळकली आहेत. त्यामुळे खडसेंच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात फडणवीस, शरद पवार आणि गिरीश महाजन यांच्यासह अनेक राजकीय दिग्गज एकाच मंचावर येणार का, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुक्ताईनगरच्या या सोहळ्याला राजकीयदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, या निमित्ताने कोणते राजकीय संदेश दिले जातात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
राजकीय कमबॅक'चा ट्रेलर
या निमंत्रण पत्रिकेतील सर्वात विशेष बाब म्हणजे, शरद पवार यांच्याबरोबरीने या पत्रिकेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थान देण्यात आले आहे. दोघांची या सोहळ्यासाठी विशेष उपस्थिती दर्शवण्यात आली आहे.
खडसे -फडणवीस यांच्यातील संबंध राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. एकेकाळी दोघांचा भाजपमधील सोबतचा दिर्घ राजकीय प्रवास, त्यानंतर झालेले मतभेद, पक्षबदल आणि त्यानंतर बदललेली राजकीय समीकरणे या सगळ्या गोष्टी पाहाता खडसेंनी शरद पवारांच्या बरोबरीने फडणवीसांना दिलेलं हे स्थान खडसेंच्या राजकीय कमबॅकचा ट्रेलर तर नाही अशा चर्चा रंगल्या आहेत.
या पत्रिकेचा दुसरा पार्ट सन्मानिय अतिथी म्हणून आहे. यात काही राज्यातील सर्वपक्षीय बडे नेते तर काही केंद्रातील बड्या नेत्यांचा समावेश आहे. तर पत्रिकेतील तिसरा पार्ट हा प्रमुख उपस्थिती असा आहे. यात राज्यातील काही काही सत्ताधारी तर काही विरोधी पक्षातील नेत्यांचे नाव व फोटो आहेत. अशाप्रकारे तीन टप्प्यात या पत्रिकेची विभागणी करण्यात आहे.
देवेंद्र फडणवीस हे एकनाथ खडसे यांचे ऐकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक राहिले आहेत. २०१६ मध्ये एका प्रकरणात एकनाथ खडसे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर खडसे-फडणवीस यांच्यातील बिघडलेले संबंध संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. राजकीय विरोधक म्हणून खडसेंनी फडणवीसांवर अनेकदा टोकाची टीका केली.
याशिवाय खडसेंचे कट्टर विरोधक असलेल्या मंत्री गिरीश महाजनांचा समावेश देखील पत्रिकेत सन्मानीय अतिथी या वर्गवारित करण्यात आला आहे. त्यानंतर खडसेंचे होमटाऊन असलेल्या मुक्ताईनगरमधील त्यांचे कट्टर विरोधक आमदार चंद्रकात पाटील यांनाही प्रमुख उपस्थिती या वर्गवारीत स्थान देण्यात आलं आहे. गिरीश महाजनांचे राईट हॅण्ड म्हणून ज्यांची ओळख आहे ते चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण तसेच एकेकाळचे राजकीय कट्टर विरोधक सुरेश जैन यांचाही फोटो व नाव निमंत्रण पत्रिकेत आहे. आपल्या राजकीय कट्टर विरोधकांना एकनाथ खडसे या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर आणू पाहत आहेत. मात्र, प्रत्यक्षात कार्यक्रमाच्या दिवशी कोणते नेते प्रत्यक्षात हजेरी लावतात, कोण अनुपस्थितीत राहतात यावरुनच या सोहळ्याचे राजकीय महत्व स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.