Pune News : कोणतीही निवडणूक तोंडावर नसताना पुण्यातील राजकीय पटलावर भाजपने अचानक मोठा राजकीय धमाका केला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी पुणे शहर भाजप कार्यालयात तीन प्रमुख नेत्यांचा अधिकृत पक्षप्रवेश पार पडला. या प्रवेशाच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलांनी आपले कट्टर राजकीय विरोधक माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अमोल बालवडकर यांना थेट त्यांच्याच बालेकिल्ल्यात जोरदार शह दिल्याचे बोलले जात आहे.
भाजपचे ‘कमळ’ हाती घेणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक उमेदवार प्रमोद निम्हण, मनसेचे शहर संघटक राहिलेले प्रल्हाद गवळी आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या महिला पदाधिकारी वैष्णवी किरड यांचा समावेश आहे.
दोन विरोधकांचा हिशोब एकाच मंचावर चुकता!
या पक्षप्रवेशाचे टायमिंग आणि निवडलेले चेहरे पाहून पुण्यातील राजकीय वर्तुळात चंद्रकांत पाटलांच्या या रणनीतीचीच चर्चा रंगली आहे. बाणेर-बालेवाडी परिसरातील नगरसेवक अमोल बालवडकर आणि चंद्रकांत पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. बालवडकरांच्या या प्रभागात तगडे राजकीय वर्चस्व असलेले माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांना भाजपमध्ये आणून पाटलांनी बालवडकरांची कोंडी करण्याची नामी संधी साधली आहे.
दुसरीकडे, कसबा मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या प्रभागातून तसेच त्यांच्या पत्नी सोबत एकाच पॅनलमध्ये निवडणूक लढवलेल्या वैष्णवी किरड यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन धंगेकरांच्या पारंपरिक बालेकिल्ल्यात धक्का दिला आहे.
निम्हणांचा राष्ट्रवादीला शेवटाचा रामराम!
प्रमोद निम्हण हे राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जात असत. गेल्या महापालिका निवडणुकीच्या वेळी प्रभाग ९ मधून राष्ट्रवादीचे पॅनल उभे करण्याचे अधिकार निम्हण यांच्याकडेच होते. मात्र, ऐनवेळी पक्षाने उमेदवारी नाकारून अमोल बालवडकर यांचा पक्षप्रवेश घडवून आणला होता. या अन्यायाविरोधात पाषाण परिसरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता आणि निम्हणांनी समर्थकांसह अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. ‘शिट्टी’ या चिन्हावर निवडणूक लढवून तब्बल १८ हजार मते घेणाऱ्या निम्हण यांनी अखेर भाजपचा मार्ग निवडला.
मनसे आणि शिंदेंच्या शिवसेनेलाही धक्का!
रविवार पेठ-नाना पेठ या मध्यवर्ती भागात वर्षानुवर्षे संघटन बांधणी करणारे प्रल्हाद गवळी यांनी मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला. गणेशोत्सवात 'मूर्ती आमची, किंमत तुमची' या उपक्रमामुळे चर्चेत राहिलेल्या गवळी यांच्या उपक्रमाला स्वतः राज ठाकरे यांनी भेट दिली होती. मात्र, आपण कोणत्याही पक्षांतर्गत वरिष्ठांना न सांगता, निव्वळ समाजासाठी काम करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचे गवळी यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.