PMC Sarakrnama
पुणे

PMC Standing Committee Members : डिसेंबरमध्ये महापालिकेत रंगणार चिठ्ठीचा खेळ ! स्थायी समितीला मिळणार अध्यक्ष पदाचा नवा चेहरा?

PMC Standing Committee members News : जानेवारी २०२६ मधील महापालिका निवडणुकीनंतर फेब्रुवारीत स्थायी समिती अस्तित्वात आली. सध्या समितीतील १६ पैकी १२ सदस्य भाजपचे असून श्रीनाथ भिमाले यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आहे.

Sudesh Mitkar

Pune News : महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी आगामी आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाची तयारी सुरू केली खरी; पण त्याआधी स्थायी समितीतील राजकीय गणितं वेगानं फिरू लागली आहेत. स्थायी समितीचे विद्यमान अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांना सलग दुसऱ्यांदा अर्थसंकल्प मांडण्याचा मान मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार, याचा फैसला डिसेंबरमधील 'चिठ्ठीच्या खेळा'त होणार आहे.

जानेवारी २०२६ मधील महापालिका निवडणुकीनंतर फेब्रुवारीत स्थायी समिती अस्तित्वात आली. सध्या समितीतील १६ पैकी १२ सदस्य भाजपचे (BJP) असून श्रीनाथ भिमाले यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार दरवर्षी स्थायीच्या निम्म्या म्हणजेच आठ सदस्यांना निवृत्त व्हावे लागते. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२७ रोजी आठ सदस्यांची मुदत संपणार आहे.

डिसेंबरमध्ये ठरणार 'स्थायी'चा पुढचा अध्याय

निवृत्त होणाऱ्या आठ सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नावे राजकीय पक्षांना त्यापूर्वी होणाऱ्या मुख्यसभेत द्यावी लागतात. मात्र, आठ सदस्यांची मुदत संपण्याची प्रत्यक्ष प्रक्रिया डिसेंबरमधील स्थायी समितीच्या बैठकीतच पार पाडावी लागते. या बैठकीचा दिवस निश्चित करण्याचा अधिकार स्थायी समिती अध्यक्षांकडे असतो.

चिठ्ठीत नाव आले तर नवा अध्यक्ष ?

आयुक्तांनी दरवर्षी १५ जानेवारीपूर्वी स्थायी समितीसमोर अंदाजपत्रक सादर करावे, असा पालिकेच्या मुख्यसभेचा ठराव आहे. वेळेत अंदाजपत्रक तयार न झाल्यास मुदतवाढ देण्याचा अधिकार स्थायी समितीला आहे. जर आयुक्तांनी १५ जानेवारीला अंदाजपत्रक सादर केले आणि निवृत्तीच्या चिठ्ठीत भिमाले यांचे नाव आले, तर त्यांना सलग दुसऱ्यांदा स्थायीचे अंदाजपत्रक सादर करता येणार नाही. चिठ्ठीत भिमाले यांचं निवृत्तीच्या चिठ्ठीत नाव आले नाही, तर दुसऱ्यांदा अंदाजपत्रक मांडण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या चिठ्ठीच्या खेळानंतर कदाचित स्थायीच्या अध्यक्षपदी दुसऱ्याची वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणाच्या गळ्यात पडणार चिठ्ठीचा फास?

स्थायी समितीतील हा चिठ्ठीचा खेळ केवळ आठ सदस्यांच्या निवृत्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही. यातूनच स्थायी समितीचा आगामी अध्यक्ष कोण होणार आणि अंदाजपत्रक मांडण्याचा मान कोणाच्या वाट्याला येणार, हे स्पष्ट होईल. चिठ्ठीचा फास कोणाच्या गळ्यात पडतो आणि कोण सुटते, याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT