pune municipal commissioner IAS Naval Kishore Ram sarkarnama
पुणे

Pune Municipal Commissioner : 'बेल बॉटम हिरो'शी तुलना नको; मुख्यमंत्र्यांच्या कौतुकानंतर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांचा रोख नेमका कुणाकडे?

Pune Municipal Commissioner News : नवल किशोर राम यांनी पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पाठबळाबद्दल आभार मानताना महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि नगरसेवकही मोहिमेसोबत असल्याचे स्पष्ट केले.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यातील अनधिकृत फ्लेक्स आणि अतिक्रमणांविरोधात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सुरू केलेल्या मोहिमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर पाठबळ दिले. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या कौतुकानंतर आयुक्तांनी केलेल्या पोस्टमधील 'बेल बॉटम हिरो' उल्लेखाने पुण्यात वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.

अतिक्रमण कारवाईवरून नवल किशोर राम यांची तुलना आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याशी केली जात असताना, 'माझी तुलना कोणत्याही बेल बॉटम हिरोशी करू नका,' अशी विनंती त्यांनी माध्यमांना केली. त्यामुळे मुंढेंशी सुरू असलेल्या तुलनेवर आयुक्तांनी अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त केली का, असा सवाल उपस्थित होत आहे.

फडणवीसांचा पाठिंबा; प्रशासनाची मोहीम चर्चेत

पुणे महापालिकेने बेकायदा होर्डिंग आणि अतिक्रमणांविरोधात सुरू केलेल्या कारवाईत राजकीय पदाधिकाऱ्यांच्या फ्लेक्सवरही उपरोधिक पोस्ट केल्या. भाजपचे (BJP) स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, महापौर मंजूषा नागपुरे आणि काँग्रेसचे गटनेते चंदूशेठ कदम यांच्या फ्लेक्सवर प्रशासनाने केलेल्या भाष्यामुळे ही मोहीम चर्चेत आली होती. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच या कारवाईचे कौतुक केले आहे. 'माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव टाका,' अशी मुख्यमंत्र्यांची टिप्पणी प्रशासनाच्या मोहिमेला आणखी बळ देणारी ठरली.

मुंढेंचा उल्लेख टाळण्याची विनंती; 'बेल बॉटम' शब्दाने लक्ष वेधले

नवल किशोर राम यांनी पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या पाठबळाबद्दल आभार मानताना महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते आणि नगरसेवकही मोहिमेसोबत असल्याचे स्पष्ट केले. त्याचवेळी माध्यमे आणि विचारवंतांना आपली तुलना कोणत्याही 'बेल बॉटम हिरो'शी, आयएएस अधिकाऱ्यांशीदेखील करू नये, अशी विनंती केली.

'बेल बॉटम' हा उल्लेख नेमका कोणाला उद्देशून आहे, याबाबत सोशल मीडियावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. यापूर्वी पुण्यातील अतिक्रमण कारवाईची तुलना तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कार्यशैलीशी केली जात होती. त्यामुळे आयुक्तांच्या या शब्दप्रयोगाचा रोख मुंढेंकडे असल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, आयुक्तांनी कोणाचेही नाव घेतलेले नाही.

तुकाराम मुंढे माझे आदर्श नाहीत

दरम्यान, दोन दिवसापूर्वी एका माध्यमाला प्रतिक्रिया देताना नवल किशोर राम यांना तुकाराम मुंढेंबाबत (Tukaram Mundhe) प्रश्न विचारला असता त्यांनी मुंडे हे आपले आदर्श नसल्याचे सांगितले होते तसंच आपले आदर्श श्रीकर परदेशीसारखे आयएएस ऑफिसर असल्याचे देखील यावेळी नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले होते. यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा देखील पाहायला मिळाल्या.

आयुक्त नेमके पोस्टमध्ये म्हणले काय ?

इतर कोणत्याही गोष्टीला महत्त्व नाही. आमच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेला माननीय मुख्यमंत्र्यांचे पाठबळ आणि कौतुक मिळणे, हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे. पुणे शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी आम्ही योग्य हेतूने काम करत आहोत. माननीय महापौर, स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते यांचा या मोहिमेला मनापासून पाठिंबा आहे. शहर स्वच्छ आणि अतिक्रमणमुक्त करण्याच्या या मोहिमेत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि सर्व नगरसेवक आमच्या सोबत आहेत.

​माध्यमे आणि विचारवंतांना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी माझी तुलना कोणत्याही बेल बॉटम हिरोशी (आयएएस अधिकाऱ्यांशी देखील) करणे टाळावे. आम्ही कोणाशीही स्पर्धा करत नाही आहोत; तर पुणे शहराला 'सर्वोत्तम राहण्यायोग्य शहर बनवण्याचे ध्येय गाठण्यासाठी आमची ही धडपड सुरू आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT