Pune Crime | Katraj Kondhwa Road Incident | CCTV Video Sarkarnama
पुणे

Pune Crime : पुण्यात काय चाललंय? परप्रांतीय व्यक्तीने सर्वांसमोर तरूणीला नको तिथे स्पर्श केला अन् बळजबरीने उचललं : कात्रजमधील घटनेने एकच खळबळ

Katraj Kondhwa Road Incident : मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला आरोपीने अयोग्य ठिकाणी स्पर्श केला. त्यानंतर त्याने तिला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर तिची मैत्रीण आणि परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले.

Jagdish Patil

Pune Crime News, 26 Oct : पुण्यातील कात्रज-कोंढवा रोडवरील सुखसागरनगर परिसरात घडलेल्या एका घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भरवस्तीत एका तरुणीला एका व्यक्तीने बळजबरीने उचलून नेण्याचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये एक व्यक्ती १८ वर्षीय तरुणीची छेड काढून तिला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, नागरिकांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तरुणीची सुटका झाली. मिळालेल्या माहितीनुसार, तरुणीला उचलून नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव जितू किशोरीलाल सरोज असे असून, तो मूळचा उत्तर प्रदेशातील आहे.

शनिवारी सायंकाळी समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबलेल्या तरुणीला आरोपीने अयोग्य ठिकाणी स्पर्श केला. त्यानंतर त्याने तिला थेट उचलून नेण्याचा प्रयत्न केला. तरुणीने आरडाओरडा केल्यानंतर तिची मैत्रीण आणि परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले. यावेळी नागरिकांनी आरोपीला पकडून चोप दिला. दरम्यान, आरोपीने एका व्यक्तीचा मोबाईल जमिनीवर आपटून नुकसान केल्याची तक्रारही पोलिसांकडे करण्यात आली आहे.

या घटनेची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. भारती विद्यापीठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, पुण्यासारख्या मोठ्या शहरात भरवस्तीत एका तरुणीला जबरदस्तीने उचलून नेण्याचा प्रयत्न करण्यापर्यंत एखाद्याची मजल जात असेल, तर शहरात कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक आहे का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, या घटनेतील पीडित तरुणीने संपूर्ण प्रकाराबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तिने सांगितले की, "शनिवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास मी सुखसागर परिसरातील समर्थ डेअरीसमोर मैत्रिणीची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी एक व्यक्ती तिथे आला. तो माझ्या शेजारून फिरल्यानंतर त्याने मला पकडले आणि थेट उचलून नेण्याचा प्रयत्न केला. इतक्यात माझी मैत्रीण तिथे आली आणि तिने त्याला ढकलले. त्यामुळे मी खाली पडले आणि माझ्या हाताला दुखापत झाली.

मी खाली पडल्यानंतरही तो माझ्या मैत्रिणीला ढकलून मला उचलून नेण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर तिथे जमलेल्या नागरिकांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांनाही मारण्याचा प्रयत्न करत होता. हा व्यक्ती माझ्यासाठी अनोळखी आहे. मी त्याला यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे. माझी मैत्रीण वेळीच आली नसती, तर तो मला उचलून घेऊन गेला असता," असे पीडित तरुणीने सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT