Sharad Sonawane Sarkarnama
पुणे

PDCC Bank Election: राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा बँकेत शिवसेनेची एन्ट्री? शरद सोनवणे मैदानात उतरणार?

Pune DCC BanK Election 2026: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार शरद सोनवणे यांच्या संभाव्य उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. नारायणगाव सहकारी सोसायटीच्या ठरावामुळे जुन्नरमधील राजकीय समीकरणांकडे लक्ष लागले आहे.

Sudesh Mitkar

Pune News: पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिले आहे. सहकाराच्या राजकारणात राष्ट्रवादीचे प्राबल्य असलेल्या या बँकेत आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना एन्ट्री करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.

जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांच्या उमेदवारीसाठी नारायणगाव सहकारी सोसायटीने ठराव केल्याने या चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे पुणे जिल्ह्यातील एकमेव आमदार असलेले सोनवणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सोनवणे यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यास जुन्नरमध्ये संजय काळे विरुद्ध शरद सोनवणे असा सामना रंगण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ सहकारी संस्थांमधील प्रतिनिधित्वापुरती मर्यादित न राहता तालुक्यातील राजकीय वर्चस्वाच्या दृष्टीनेही महत्त्वाची ठरू शकते. मात्र, सोनवणे यांच्या उमेदवारीबाबत अद्याप अंतिम निर्णय स्पष्ट झालेला नाही.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शिंदेसेनेचे आव्हान?

पुणे जिल्हा बँक ही जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील महत्त्वाची संस्था मानली जाते. या बँकेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. त्यामुळे या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराने उमेदवारी केल्यास त्याला केवळ एका जागेची निवडणूक म्हणून पाहता येणार नाही.

संजय काळेंसमोर सोनवणे यांचे आव्हान?

जुन्नर तालुक्यात जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी विद्यमान संचालक संजय काळे यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार, याची चर्चा सुरू होती. आता सोनवणे यांच्या उमेदवारीसाठी ठराव झाल्याने संभाव्य लढतीची चर्चा रंगू लागली आहे.

त्यामुळे आता या निवडणुकीत सहकारी संस्थांचे प्रतिनिधी, मतदारांची जुळवाजुळव आणि स्थानिक नेत्यांचे पाठबळ महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे सोनवणे उमेदवारी करतात का आणि त्यांना कोणत्या नेत्यांचा पाठिंबा मिळतो, यावर पुढील राजकीय घडामोडींचे लक्ष असेल.

बेनके, शेरकर, लेंडे यांच्या भूमिकेकडे लक्ष

जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांची भूमिका या निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते. त्याचबरोबर माजी आमदार अतुल बेनके आणि श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांची भूमिका काय राहणार, याबाबतही उत्सुकता आहे.

दिवंगत आशाताई बुचके यांना मानणाऱ्या मतदारांची भूमिकाही निवडणुकीत महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे संभाव्य उमेदवारांसोबतच स्थानिक राजकीय नेत्यांच्या भूमिका आणि सहकारी संस्थांमधील मतांचे गणित याकडे लक्ष लागले आहे.

एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या पुणे जिल्हा बँकेत शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार उतरतो का, हा या निवडणुकीतील चर्चेचा महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे. शरद सोनवणे यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतल्यास जुन्नरमधील संभाव्य लढतीसोबतच जिल्हा बँकेच्या राजकारणात नव्या पक्षीय समीकरणांची चर्चा सुरू होऊ शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT