District Bank Election Sarkarnama
पुणे

Shirur News: “5000 रुपये द्या, पोलिस संरक्षण घ्या! जिल्हा बँकेच्या ठरावांतील राड्यानंतर शिरूरमध्ये नवा फॉर्म्युला”

Pune District Bank election : पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी ठरावांच्या प्रक्रियेत शिरूर तालुक्यात तणाव वाढला असून, विविध गावांमध्ये बैठकींसाठी नियमानुसार शुल्क भरून पेड पोलिस बंदोबस्ताची मागणी वाढत आहे.

Sudesh Mitkar

Pune District Bank Election : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सोसायटी मतदारसंघात सध्या ठरावांच्या राजकारणाने चांगलाच पेट घेतला आहे. गावोगावी ठराव आपल्या बाजूने पदरात पाडून घेण्यासाठी उमेदवारांमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचाचा थेट ताप आता पोलिसांना सहन करावा लागत आहे. कासारी येथील मारहाणीच्या घटनेनंतर शिरूर तालुक्यात वातावरण तापले असून, ठरावाच्या बैठकांसाठी सुरक्षेची मागणी वाढल्याने बंदोबस्त पुरवताना पोलिसांची पार 'दमछाक' झाली आहे. यावर तोडगा म्हणून आता पोलिसांनी ‘मागेल त्याला पेड बंदोबस्त’ देण्याचे हत्यार उपसले आहे.

तालुक्यातील १३३ सोसायट्यांमध्ये मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी एका नावाचा ठराव मंजूर करणे आवश्यक आहे. सध्याच्या चित्रानुसार, विद्यमान संचालक तथा माजी आमदार अशोक पवार आणि विरोधी गटाकडून स्वर्गीय अरुणआबा गायकवाड यांचे सुपुत्र स्वप्निल गायकवाड किंवा माजी उपसभापती राजेंद्र जासूद यांच्यात मुख्य लढत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक गावात ठराव पदरात पाडण्यासाठी ईर्ष्या शिगेला पोहोचली आहे.

​कासारीतील राड्यानंतर पाबळमध्ये तणाव

गेल्या ७ सप्टेंबर रोजी कासारी येथे संचालक राजेंद्र काकडे यांना झालेल्या मारहाण आणि जिवे मारण्याच्या धमकीच्या प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याचाच प्रत्यय मंगळवारी पाबळ येथे विविध कार्यकारी सोसायटीच्या बैठकीदरम्यान आला. येथे वातावरण चिघळण्याची शक्यता पाहता १ अधिकारी, १० कर्मचारी आणि बंदोबस्त व्हॅन तैनात करण्यात आली होती. अखेर अत्यंत तणावपूर्ण वातावरणात योगेश चौधरी यांचा ठराव ७ विरुद्ध ४ अशा फरकाने मंजूर झाला.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील अन्य गावांमधूनही अशाच प्रकारे बंदोबस्ताची मागणी पुढे येत आहे. पिंपळे खालसा येथे नुकताच ‘पेड’ पोलिस बंदोबस्त मंजूर करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे. रांजणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ढोक सांगवी, गणेगाव खालसा, निमगाव भोगी आणि वाघाळे या गावांनीही ‘पेड’ बंदोबस्ताची मागणी केली असून, तो मंजूर करण्यात आला आहे.

ठरावांच्या प्रक्रियेत वाद होण्याची शक्यता लक्षात घेता, मागणी करणाऱ्या संस्थांना नियमानुसार शुल्क भरून पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेची निवडणूक अद्याप प्रत्यक्ष मतदानाच्या टप्प्यावर पोहोचली नसली, तरी ठरावांच्या प्रक्रियेतच गावागावातील राजकीय वातावरण तापू लागल्याचे चित्र आहे.

‘मागेल त्याला पेड बंदोबस्त’

जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदारसंघात सध्या ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. अनेक गावांमधून पोलिस बंदोबस्ताची मागणी होत आहे. जो कोणी बंदोबस्त मागेल, त्याला नियमानुसार ‘पेड’ पोलिस बंदोबस्त देण्याची आमची तयारी आहे. त्यासाठी संबंधितांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून मागणी करावी, अशी माहिती शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

एका पोलिस शिपायासाठी सुमारे ३५०० रुपये, तर अधिकाऱ्यासाठी ५००० रुपये (जीएसटीसह) या दराने मागणीनुसार बंदोबस्त दिला जात असल्याची माहिती रांजणगाव गणपती पोलिस ठाण्यातील गोपनीय पोलिस हवालदार ब्रह्मा पोवार यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT