PDCC Bank election Sarkarnama
पुणे

PDCC Bank Election : पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजले, विरोधक पवारांना घेरणार, कुठे पाहता येणार प्रारूप यादी?

PDCC Bank NCP Vs BJP Voter List : प्रारूप मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलांबाबत आक्षेप असल्यास संबंधितांना पुराव्यांसह लेखी हरकत नोंदवता येणार आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे. बँकेच्या सन २०२६,२०३२ या कालावधीसाठी आज प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. या यादीवर २३ ऑक्टोबरपर्यंत हरकती व आक्षेप नोंदवता येणार असून, ५ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सभासद संस्थांच्या ठरावांवरून सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे.

जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक दिग्विजय आहेर यांनी याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. संचालक मंडळाचा कार्यकाळ २०२६,२७ ते २०३१,३२ असा असून, निवडणुकीसाठी सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव २४ ऑगस्ट ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत स्वीकारण्यात आले होते. या ठरावांच्या आधारे प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे.

हरकतींसाठी २३ ऑक्टोबरपर्यंत मुदत

प्रारूप मतदार यादीतील नाव, पत्ता किंवा अन्य तपशिलांबाबत आक्षेप असल्यास संबंधितांना पुराव्यांसह लेखी हरकत नोंदवता येणार आहे. त्यासाठी आक्षेपकर्त्यांनी आपले नाव, पत्ता, दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ई-मेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे.

१४ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत सार्वजनिक सुट्ट्या वगळून कार्यालयीन वेळेत जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग यांच्या कार्यालयात हरकती दाखल कराव्या लागणार आहेत. मुदतीनंतर आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्राप्त हरकतींवर २ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्यात येणार असून, त्यानंतर ५ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.

सहकारातील राजकीय समीकरणांकडे लक्ष

पीडीसीसी बँकेच्या निवडणुकीत सभासद संस्थांचे प्रतिनिधी आणि त्यांचे ठराव महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे प्रारूप मतदार यादीत कोणत्या संस्थांच्या प्रतिनिधींना स्थान मिळाले आहे, याकडे इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. मतदार यादीवरील हरकती आणि त्यावरील निर्णयांमुळे निवडणुकीतील संभाव्य राजकीय समीकरणांवरही परिणाम होऊ शकतो.

कुठे पाहता येणार प्रारूप यादी?

प्रारूप मतदार यादी जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, पुणे विभाग यांच्या साखर संकुल येथील कार्यालयात पाहण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच पीडीसीसी बँकेचे मुख्य कार्यालय, जिल्हा उपनिबंधक (पुणे शहर व पुणे ग्रामीण) यांची कार्यालये, जिल्ह्यातील सर्व तालुका सहकारी निवडणूक अधिकारी तथा उपनिबंधक आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), पुणे यांच्या कार्यालयांतही यादी पाहता येणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या संकेतस्थळावरही ही यादी उपलब्ध होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT