पुणे जिल्हातील दौंड तालुक्यात ग्रामस्थांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कासुर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन करून दोन नव्या ग्रामपंचायती स्थापन करण्यात आल्या आहेत. अधिसुचनेनुसार आता कासुर्डी, कामठवाडी आणि जावजीबुवावाडी या तीन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तिवात आल्या आहेत. अनेक वर्षापासून सुरु असलेल्या मागणीला अखेर यश मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मागणी तर पूर्ण झाली आहे पण आता निवडणुकीचे वेध येथील ग्रामस्थांना लागले आहेत.
कासुर्डी हे मोठ्या भौगोलिक क्षेत्रात पसरलेले गाव आहे. गावाची लोकसंख्या सुमारे 6500 इतकी असून प्रशासकीय कामांसाठी ग्रामपंचायतीशी संपर्क साधताना नागरिकांना अडचणी येत होत्या. गावाचा विस्तार मोठा असल्याने सर्व भागांपर्यंत सुविधा पोहोचवणे कठीण होत असल्याची तक्रार वारंवार पुढे येत होती. त्यामुळे गावाचे विभाजन करून स्वतंत्र ग्रामपंचायती स्थापन कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली होती.
30 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या ग्रामसभेत हा विषय अधिकृतरित्या मांडण्यात आला. ग्रामस्थ बापू जगताप यांनी विभाजनाचा ठराव मांडला आणि त्यास तानाजी राजवडे यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर संबंधित प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला. ग्रामसेवक बालाजी सरवदे यांनी आवश्यक माहिती संकलित करून पुढील प्रक्रिया सुरू केली. ग्रामपंचायतीमार्फत सर्व कागदपत्रे शासनाकडे सादर करण्यात आली.
सुमारे एक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला. मंत्रालयातील कक्ष अधिकारी स्नेहल बर्गे यांनी यासंदर्भात अध्यादेश जारी केला. त्यानुसार 30 डिसेंबर 2025 पासून कासुर्डी, कामठवाडी आणि जावजीबुवावाडी ही स्वतंत्र महसुली गावे म्हणून घोषित करण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने या तिन्ही गावांमध्ये स्वतंत्रपणे ध्वजवंदन कार्यक्रम पार पडला, ज्यामुळे ग्रामस्थांच्या स्वायत्ततेच्या भावनेला अधिक बळ मिळाले.
दरम्यान, दौंड तालुक्यातील ग्रामपंचायतींची संख्या देखील वाढली आहे. सुमारे एक वर्षापूर्वी तालुक्यात 81 ग्रामपंचायती होत्या. त्यानंतर विविध गावांच्या पुनर्रचनेमुळे नव्या ग्रामपंचायतींची भर पडली. गार गावाचे विभाजन होऊन गार, नवीन गार आणि बेटवाडी अशा तीन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या. तसेच हिंगणीबेर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन होऊन हिंगणीबेर्डी आणि काळेवाडी अशा दोन ग्रामपंचायती स्थापन झाल्या. आता कासुर्डीच्या विभाजनामुळे आणखी तीन ग्रामपंचायतींची भर पडली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.