Pune News: पुणे जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधी वाटपात जिल्हा परिषद सदस्यांच्या वाट्याला अवघा २० टक्के निधी येणार असून, आमदारांना त्याच्या दुप्पट म्हणजे ४० टक्के निधी मिळणार आहे.
खासदार आणि विधान परिषद सदस्यांसाठी प्रत्येकी १० टक्के निधी राखीव ठेवण्यात आला असून, उर्वरित ३० टक्के निधी पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अधिकारात राहणार आहे. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही ७३ सदस्यांच्या वाट्याला कमी निधी आल्याने राजकीय नाराजी उफाळण्याची शक्यता आहे.
जिल्ह्याचा १ हजार ४७२ कोटी रुपयांचा वार्षिक जिल्हा नियोजन आराखडा मंजूर झाला आहे. मात्र, निधीच्या वाटपाचे सूत्र निश्चित होत नसल्याने महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. आमदारांना प्राधान्य द्यायचे की जिल्हा परिषद सदस्यांना अधिक निधी द्यायचा, यावरूनही मतभेद होते. अखेर पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी निधी वाटपाचे सूत्र निश्चित केले असून, त्यात आमदारांना झुकते माप मिळाल्याचे चित्र आहे.
जिल्हा परिषदेच्या जनसुविधा, नागरी सुविधा, ग्रामीण रस्ते, इतर जिल्हा मार्ग, आरोग्य, महिला व बालकल्याण, कृषी, पशुसंवर्धन आणि लघूपाटबंधारे अशा विविध विभागांना निधीची प्रतीक्षा होती. एप्रिलपासून उपलब्ध झालेल्या निधीतील काही रक्कम पुणे ग्रँड टूर, आरोग्य आणि अन्य कामांसाठी खर्च झाली. नोव्हेंबर उजाडला तरी जिल्हा परिषदेच्या अनेक विभागांना निधीची प्रत्यक्ष तरतूद न झाल्याने विकासकामांचे नियोजन रखडण्याची शक्यता निर्माण झाली होती.
आता निधी वाटपाचे सूत्र निश्चित झाल्यानंतर कार्यान्वयीन यंत्रणांना कामांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, ७३ जिल्हा परिषद सदस्यांना एकूण निधीच्या केवळ २० टक्के वाटा मिळणार असल्याने ग्रामीण भागातील विकासकामांसाठी सदस्यांना मर्यादित निधीवरच समाधान मानावे लागणार आहे.
जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही निधी वाटपात सदस्यांना आमदारांच्या तुलनेत निम्माच हिस्सा मिळत आहे. जिल्हा नियोजन समितीच नव्हे, तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतही आमदारांना प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र आहे. या योजनेत प्रत्येक आमदारासाठी २५ किलोमीटर रस्त्यांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
त्यामुळे जिल्हा परिषदेत सत्ता असूनही विकासकामांसाठी निधीचे अधिकार मर्यादित राहणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. निधी वाटपाच्या या सूत्रावर जिल्हा परिषद सदस्य काय भूमिका घेतात आणि सत्ताधारी पक्षातील नाराजी उघडपणे समोर येते का, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.