Pune News : पुण्यातील एफसी रोड वरील एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर रविवारी मोठी खळबळ उडाली. त्यानंतर पोलिस ॲक्शन मोडमध्ये आले असून आत्तापर्यंत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या प्रकरणांमध्ये दोन पोलिसांना निलंबित केले आहे.
एफसी रोडवरील एल थ्री बारच्या (Drugs party in Pune hotel) स्वच्छतागृहामध्ये काही तरुण ड्रग्ज घेत असल्याचं व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. माध्यमांमध्ये याची चर्चा व्हायला लागल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. हे हॉटेल सचिन कामठे आणि संतोष कामठे यांच्या मालकीचे आहे. मात्र त्यांनी ते भाडे तत्त्वावर रवी माहेश्वरी, उत्कर्ष देशमाने आणि योगेंद्र गिरासे यांना चालवण्यासाठी दिले आहे.
शनिवारी अक्षय कामठे या व्यक्तीने 50 ते 60 लोकांना या ठिकाणी पार्टी करायची असल्याचं सांगितलं. पार्टी करण्यास बार चालकांनी देखील परवानगी दिली. ही पार्टी सुमारे सकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होती.
याच पार्टीमध्ये अमली पदार्थ सेवन झाल्याचा संशय पोलिसांना आहे. आतापर्यंत पोलिसांकडून आठ जणांना अटक करण्यात आली. पार्टीचे आयोजन करणाऱ्या अक्षय कामठे याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांकडून चार संशयीत व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. नेमकं या पार्टीमध्ये ड्रग्ज घेण्यात आलं का? आणि घेतलं असल्यास हे नेमकं कुठून आले याचा तपास पोलिस करीत आहेत.
पोलिसांकडून पार्टीला उपस्थित असलेल्या सर्व मुलांचा शोध घेण्यात सुरवात केली आहे. पार्टीला उपस्थित असलेले काही जण अल्पवयीन असल्याचा देखील पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास पुढे जाईल तसं मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह इतर अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह अन्य नेत्यांनी देखील या प्रकरणानंतर सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.